शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हिंदी पत्रकारितेची 200 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा येथे राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन


पद्मश्री विजय दत्त श्रीधर यांनी जन-केंद्रित पत्रकारिता आणि सामाजिक जबाबदारीवर दिला भर

Posted On: 05 NOV 2026 2:01PM by PIB Mumbai

Nagpur, November 5, 2026

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ (एमजीएएचव्ही), वर्धा यांनी हिंदी पत्रकारितेला 200 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. 4 नोव्हेंबर रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कस्तुरबा सभागृहामधील उद्घाटन सत्रात, "हिंदी पत्रकारितेची 200 वर्षे: वारसा, चिंता आणि विकसित भारताचा संकल्प" या संकल्पनेवर, जनसंवाद विभागातर्फे आयोजित या चर्चासत्राची सुरुवात झाली. आपल्या बीज भाषणात, भोपाळ येथील 'सप्रे संग्रहालया'चे संस्थापक पद्मश्री विजय दत्त श्रीधर,  म्हणाले की, पत्रकारिता ही सरकारधार्जिणी किंवा सरकारविरोधी नसावी, तर ती मूलतः लोकाभिमुख असावी. कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा या सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या. रायपूरच्या कुशाभाऊ ठाकरे पत्रकारिता आणि जनसंवाद विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.मनोज दयाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर नॅशनल बुक ट्रस्ट, इंडियाचे माजी अध्यक्ष प्रा. बलदेव भाई शर्मा या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. कुलसचिव डॉ. सुरेंद्र गाडेवार हे देखील उपस्थित होते.

पद्मश्री श्रीधर यांनी मुद्रित पत्रकारितेच्या उत्क्रांतीचा मागोवा घेतला आणि भाषा, अभिव्यक्ती, लेखन शैली आणि व्यावसायिक कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. हिंदी पत्रकारितेच्या विकासासाठी युगल किशोर शुक्ल, भारतेंदू हरिश्चंद्र आणि बाबूराव विष्णू पराडकर यांसारख्या अग्रणींनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी स्मरण केले. प्रा.मनोज दयाल यांनी मानवी भावना आणि संवेदनशीलता यांना पत्रकारितेच्या केंद्रस्थानी ठेवण्याच्या गरजेवर भर दिला आणि हिंदी वृत्तपत्रांचे डिजिटल संग्रहालय तयार करण्याचा प्रस्ताव मांडला. प्रा. बलदेव भाई शर्मा यांनी, लोककल्याण आणि राष्ट्रीय जाणीवेप्रति वचनबद्ध असलेले जबाबदार पत्रकार घडवण्यासाठी भारतीय पत्रकारितेच्या इतिहासाचा अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात, कुलगुरू प्रा. कुमुद शर्मा यांनी स्वातंत्र्य चळवळीतील हिंदी पत्रकारितेच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे स्मरण केले आणि लोकशाही मूल्ये मजबूत करण्या संदर्भात, हिंदी पत्रकारितेची निरंतर जबाबदारी अधोरेखित केली. पत्रकारितेने आपल्या सामाजिक भूमिकेबाबत जागरूक राहण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. या परिसंवादातील शैक्षणिक चर्चासत्रांमध्ये प्रामुख्याने हिंदी पत्रकारितेचा वारसा, कृत्रिम बुद्धिमत्तेचे नैतिक पैलू आणि  त्यापुढील आव्हाने, विकसित भारताच्या संदर्भात भाषा आणि संस्कृती, आणि सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्माणात माध्यमांची भूमिका या विषयांवर केंद्रित आहेत.

दीपप्रज्वलन आणि विद्यापीठाच्या गीत गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी स्मरणिका, विभागीय माहितीपट आणि ‘मीडिया समय’ हे नियतकालिक प्रकाशित करण्यात आले. प्रा. के. बालराजू यांनी स्वागतपर भाषण केले, तर डॉ. राजेश लेहकापुरे यांनी प्रास्ताविक मांडले. डॉ. रेणू सिंह यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि डॉ. संदीप कुमार वर्मा यांनी आभार प्रदर्शन केले. उद्घाटन सत्राला संपादक, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक सदस्य, संशोधक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

***

NehaKulkarni / RajshreeAgashe / DIneshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2332976) अभ्यागत कक्ष : 21