Posted On:
05 NOV 2026 8:51PM by PIB Mumbai
रांची येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ' संशोधन आणि विकास-2026 हॅकेथॉन' मध्ये नागपूरच्या सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (CSIR-NEERI) प्रॉब्लेम स्टेटमेंट-2 अंतर्गत प्रथम पारितोषिक पटकावले आहे. केंद्र सरकारच्या कोळसा मंत्रालयांतर्गत कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या रांचीच्या 'सेंट्रल माइन प्लॅनिंग ऍन्ड डिझाइन इन्स्टिट्यूट लिमिटेड'ने (CMPDI) या स्पर्धेचे आयोजन केले होते.
कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांनी 2 नोव्हेंबर 2026 रोजी मयूर लेक, रायपूर येथे आयोजित कोळसा आणि लिग्नाइट खाणींच्या स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान केला. डॉ. आशिष शर्मा (वैज्ञानिक-एफ आणि प्रमुख, आयटी व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर युनिट आणि सेंटर ऑफ एन्व्हायर्नमेंटल इंटेलिजन्स अँड डिजिटल सिस्टिम्स) आणि डॉ. कांचन कुमारी (वैज्ञानिक-एफ, सीएसआयआर-नीरी कोलकाता प्रादेशिक केंद्र) यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या कार्यक्रमात सनोज कुमार झा (अप्पर सचिव, कोळसा मंत्रालय), बी. साईराम (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, कोल इंडिया लिमिटेड), बिरेन्द्र कुमार ठाकूर (संचालक - तांत्रिक, कोळसा मंत्रालय) आणि आनंद मोहन (संचालक - तांत्रिक, CMPDI) उपस्थित होते.
सीएसआयआर-नीरी (CSIR-NEERI) च्या “वृक्ष गणना, प्रजातींची ओळख आणि वृक्षांच्या उंचीचा अंदाज यासाठी AI आणि ML-आधारित GIS मॉडेलचा विकास” या नाविन्यपूर्ण प्रस्तावाला हे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. “स्मार्ट मायनिंगसाठी नेक्स्टजेन एआय” या संकल्पनेवर आधारित या हॅकेथॉनमध्ये देशभरातून 70 प्रस्ताव प्राप्त झाले होते, ज्यामधून सीएसआयआर-नीरीच्या प्रस्तावाची सादरीकरणासाठी निवड झाली आणि कोळसा क्षेत्रातील संभाव्य वापरासाठी त्याला प्रथम पारितोषिक देण्यात आले.
सीएसआयआर-नीरी टीमचे नेतृत्व डॉ. आशिष शर्मा (मुख्य प्रमुख संशोधक ) आणि डॉ. कांचन कुमारी (सह-प्रमुख संशोधक ) यांनी केले. या टीममध्ये (AcSIR) चे पीएचडी विद्यार्थी मनदीप पुनिया आणि प्रोजेक्ट असोसिएट्स - रोहित नाले, अंकुश राय, आर्या वडसमुद्रकर, अभिषेक दळवी, नेहा नसीम, पूजा सदाशिव, प्रद्युम्न गोंडाणे आणि रजत यांचा समावेश होता. या टीमला डॉ. सरवण देवी (वैज्ञानिक जी आणि माजी (AcSIR) समन्वयक) आणि डॉ. एस. वेंकट मोहन (संचालक, CSIR-NEERI) यांचे मार्गदर्शन लाभले.
जैवविविधता देखरेख, जंगल मूल्यांकन आणि शाश्वत खाणकामासाठी उपयुक्त असलेला हा पुरस्कारप्राप्त प्रस्ताव स्वयंचलित वृक्ष मूल्यांकनासाठी AI-ML आणि GIS-आधारित दृष्टिकोन सादर करतो. राष्ट्रीय स्तरावरील हे यश म्हणजे सीएसआयआर-नीरीसाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी असून पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी तंत्रज्ञान-आधारित उपाय विकसित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे दर्शन घडवत आहे.
***
Radhika Aghor / Shailesh Patil / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai