Posted On:
14 NOV 2026 8:57PM by PIB Mumbai
नागपूर 14 नोव्हेंबर 2026
जलव्यवस्थापन, पीक नियोजन, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) शेतीतील वापर आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी १७ व्या ॲग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन, कार्यशाळा आणि परिषदेचे २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय परिसरात, अमरावती मार्ग, नागपूर येथे आयोजन करण्यात येणार आहे. ॲग्रोव्हिजनचे यंदा १७ वे वर्ष असून, दरवर्षी या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढतो आहे .

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या प्रदर्शनामध्ये जलसंधारणावर विशेष भर राहणारे असल्याची माहिती
माहिती ॲग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून दरवर्षी विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती, नवीन तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील बदलांची माहिती एकाच मंचावर मिळते. मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून या उपक्रमाने राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी लाखो शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतात. शेतीमधील बदलती आव्हाने आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून यंदाच्या प्रदर्शनात विशेष भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी चारही दिवस प्रदर्शनाला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि विविध प्रयोगांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य नितीन गडकरी यांनी यावेळी केले.
एआयमुळे खर्चात बचत, उत्पादनात वाढ शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढविण्यावर भर देत गडकरी म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खतांचा आणि औषधांचा खर्च ५० टक्क्यांपर्यंत कमी करणे, पाण्याची बचत करणे आणि उत्पादनात वाढ करणे शक्य आहे. वेदर स्टेशन, सेन्सर, ड्रोन आणि उपग्रहांच्या माध्यमातून पिकांच्या स्थितीची माहिती थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होऊ शकते. पिकाला पाण्याची गरज कधी आहे, पुढील फवारणी कधी करायची, यासारख्या सूचना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळू शकतात.
यासाठी संत्रा, ऊस आणि तूर या पिकांसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २६ ऊस उत्पादक आणि ३४ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयोगांचा फायदा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे श्री गडकरी यांनी सांगितले.
ॲग्रोव्हिजन २०२६ ला एमएसएमईची मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय कृषी प्रदर्शनासाठी यंदाही तीन मोठे हँगर उभारण्यात येणार असून, मोठ्या कृषी यंत्रसामग्री आणि उपकरणांच्या प्रदर्शनासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यंदाच्या प्रदर्शनात ४५० नामांकित कंपन्या आणि कृषी संस्थांचा सहभाग अपेक्षित आहे. स्टार्टअप, एमएसएमई आणि नवोन्मेषकांसाठी स्वतंत्र पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांसाठी मोफत कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी ३० कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन या परिस्थितीशी सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन देणाऱ्या कार्यशाळा जसे दुष्काळी परिस्थितीत एआय चा वापर करून संत्रा बागांचे व्यवस्थापन, पशुसंगोपन व चाऱ्याचे नियोजन, पाण्याचा योग्य वापर आणि पाणी नियोजनाच्या यंत्रणांबाबत, दुष्काळातील पीक नियोजन यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कमी पाण्यात फळबागा, ऊस आणि कापसाची शेती कशी करता येईल, याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय शेतीपूरक व्यवसाय, आधुनिक कृषी उपकरणे आणि तंत्रज्ञानाची माहितीही शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
***
धनंजय वानखेडे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com