Posted On:
15 NOV 2026 3:37PM by PIB Mumbai
पुणे, दि. 15 नोव्हेंबर 2026
केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारातून आज पुणे येथे ‘राष्ट्रीय एकता दौड’चे आयोजन करण्यात आले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित या मॅरेथॉनला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या निमित्ताने पुण्याच्या रस्त्यांवर आज उत्साहाचा अभूतपूर्व जल्लोष पाहायला मिळाला! हजारो धावपटूंचा सळसळता उत्साह, तरुणाईचा प्रचंड जोश आणि नशामुक्त युवा भारताचा बुलंद संकल्प अशा वातावरणात ‘राष्ट्रीय एकता दौड’ ही मॅरेथॉन मोठ्या दिमाखात पार पडली. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आले होते.

मॅरेथॉनचा शुभारंभ लोकमान्य टिळक चौक (अलका टॉकीज) येथून मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे उच्च वा तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

या भव्य मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटूंसह देशाच्या विविध भागांतून आलेल्या धावपटूंनी सहभाग घेतला. पुणेकरांनीही या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. तब्बल 40 हजारांच्या आसपास धावपटूंनी नोंदणी केल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली… तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटांतील नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकात्मता, निरोगी जीवनशैली आणि नशामुक्तीचा संदेश दिला.
_20261115154015_e66784.jpeg)
एक भारत, श्रेष्ठ भारत आणि नशामुक्त युवा भारताचा संकल्प घेऊन पुणेकरांनी आज केवळ मॅरेथॉनमध्ये धाव घेतली नाही, तर एका निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त भारताच्या दिशेने एकजुटीने पाऊल टाकले. पुणेकरांचा हा अभूतपूर्व उत्साह, हजारो धावपटूंचा सहभाग आणि नशामुक्तीचा बुलंद संदेश यामुळे पुण्याची ही राष्ट्रीय एकता दौड लक्षवेधी ठरली. अखेर फर्ग्युसन महाविद्यालय येथे या राष्ट्रीय एकता दौडचा समारोप झाला.

***
हर्षल अकुडे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com