Posted On:
16 NOV 2026 5:42PM by PIB Mumbai
मुंबई, 16 नोव्हेंबर 2026
एनटीपीसी लिमिटेडच्या मुंबई येथील पश्चिम विभागीय मुख्यालयाने उर्जा कार्यक्षमता मंडळ (बीईई) महाराष्ट्र राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा 2026 मुंबईमध्ये एसएनडीटी महिला विद्यापीठात आयोजित केली होती. बालदिनाचे औचित्य साधून या स्पर्धेच्या माध्यमातून सर्जनशीलता, जागरुकता आणि शाश्वतता यांना प्रोत्साहन देण्यात आले.
केंद्रिय उर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली उर्जा कार्यक्षमता मंडळातर्फे (बीईई) दरवर्षी उर्जा संवर्धन या विषयावरील राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी एनटीपीसीची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यावर्षी ही स्पर्धा ‘शाळा व घरामध्ये उर्जा बचत’ आणि ‘उर्जा संवर्धन ही उर्जा सुरक्षेची गुरुकिल्ली’ या दोन संकल्पनांवर आधारित होती. महाराष्ट्रातून या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राथमिक फेरीमध्ये 378 शाळांमधील 1300 पेक्षा जास्त विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते. निवड प्रक्रियेनंतर अ गट (इयत्ता 5 वी ते 7 वी) आणि ब गटात (इयत्ता 8 वी ते 10 वी) प्रत्येकी 50 असे एकूण 100 विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले. या स्पर्धकांनी त्यांचे कलानैपुण्य व उर्जा संवर्धनाबाबतची समज चित्रांच्या माध्यमातून सादर केले.
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे मुख्य सचिव रणजीत सिंग देओल, एनटीपीसी लिमिटेडचे कार्यकारी संचालक (आण्विक) निर्भय गुप्ता आणि एचआरचे क्षेत्रिय प्रमुख, डब्ल्यूआर-1 मुख्यालय आणि जीएम-एचआर (आण्विक) अनिल कुमार चावला यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

गट अ (इयत्ता 5 वी ते 7 वी)
प्रथम क्रमांक – सृष्टी अमर ढगे – क्लाइन मेमोरियल स्कूल ऑफ यूबीएल, पुणे
द्वितीय क्रमांक – श्रेष्ठा सुदर्शन चव्हाण – सेंट पीटर्स स्कूल, माझगांव
तृतीय क्रमांक – शेख सलमान खाजा – ज्ञानेश्वर हायस्कूल, लातूर
गट ब (इयत्ता 8 वी ते 10 वी)
प्रथम क्रमांक – हना हयात – ऍटॉमिक एनर्जी सेंट्रल स्कूल 2, मुंबई
द्वितीय क्रमांक - मंजुश्री शिवाप्पा बुगडे – एस. आर. चांडक इंद्लिश हायस्कूल, सोलापूर
तृतीय क्रमांक – आचल पांडुरंग वानखेडे – हिराराम गर्ल्स हायस्कूल, इचलकरंजी

प्रथम क्रमांकासाठी ₹50,000, द्वितीय क्रमांकासाठी ₹30,000 आणि तृतीय क्रमांकासाठी ₹20,000 पुरस्कार देण्यात आला. याशिवाय दोन्ही गटांमध्ये ₹7,500 प्रत्येकी असे दहा उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.
प्रत्येक गटातील पहिले तीन विजेते राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतील. नवी दिल्ली येथे 11 डिसेंबर 2026 रोजी ही स्पर्धा होणार असून स्पर्धेतील सहभागासाठीचा सर्व खर्च एनटीपीसी पश्चिम क्षेत्रिय मुख्यालयातर्फे केला जाणार आहे.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी युवा स्पर्धकांचा उत्साह, सर्जनशीलता आणि चिकाटी यांची प्रशंसा केली. बाल वयातच उर्जा बचतीच्या सवयी लावण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच घर, शाळा व समाजामध्ये जागरुकता निर्माण करुन उर्जा बचतीचे दूत होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर /सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai