Posted On:
16 NOV 2026 8:36PM by PIB Mumbai
पुणे, 16 नोव्हेंबर 2026
देशभरात 18 नोव्हेंबर 2026 रोजी 9वा राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिन साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीची संकल्पना “प्राकृतिक चिकित्सा, स्वस्थ भारत” अशी आहे. या निमित्ताने राष्ट्रीय स्तरावरील मुख्य कार्यक्रम कर्नाटकातील नागमंगला येथील केंद्रीय योग व प्राकृतिक चिकित्सा अनुसंधान संस्थान (CRIYN) येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे. केंद्रीय योग व प्राकृतिक चिकित्सा अनुसंधान परिषद (CCRYN) आणि राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था (NIN), पुणे यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
या वर्षीची संकल्पना प्राकृतिक चिकित्सा, संतुलित आहार, नियमित शारीरिक हालचाल, योग, तणाव व्यवस्थापन आणि आरोग्यदायी जीवनशैली यांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देण्यावर केंद्रित आहे. जीवनशैलीशी संबंधित आरोग्यविषयक समस्यांबाबत जनजागृती करणे तसेच प्राकृतिक चिकित्सा क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधन, वैद्यकीय मूल्यमापन आणि जनजागृती अधिक बळकट करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या निमित्ताने राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था (NIN), पुणे यांच्या वतीने येवलेवाडी येथील निसर्ग ग्राम परिसरात 16 ते 18 नोव्हेंबर 2026 या कालावधीत तीन दिवसीय ‘प्राकृतिक चिकित्सा महोत्सव–2026’ आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांना प्राकृतिक चिकित्सेची तत्त्वे, विविध उपचारपद्धती आणि त्यांचे महत्त्व समजावून सांगणे तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, 16 नोव्हेंबर रोजी मड बाथ दिवस (मृत्तिका स्नान दिवस) आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने मातीच्या उपचारपद्धतीची तत्त्वे, फायदे आणि प्राकृतिक चिकित्सेतील महत्त्व यावर जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांसह इतर सहभागी नागरिकांसाठी मोफत मड बाथची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. वैद्यकीय सल्ला आणि मोफत रक्तदाब तपासणीनंतर, वैद्यकीयदृष्ट्या योग्य असलेल्या व्यक्तींना मड बाथ आणि थंड पाण्याने स्नानाची सुविधा दिली जाईल.
दुसऱ्या दिवशी, 17 नोव्हेंबर रोजी सन बाथ दिवस (सूर्यस्नान दिवस) आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी सूर्यस्नान उपचारपद्धतीची तत्त्वे, फायदे आणि आवश्यक खबरदारी यावर जनजागृतीपर व्याख्यान होईल. बाह्यरुग्ण आणि इतर सहभागी नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्ला व रक्तदाब तपासणीची सुविधा उपलब्ध असेल. त्यानंतर वैद्यकीय उपयुक्ततेनुसार सूर्यस्नान, थंड पाण्याने स्नान तसेच पोटावर आणि डोळ्यांवर मातीचे पॅक लावण्याची सुविधा दिली जाईल.
महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी, 18 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा दिन विशेष कार्यक्रम आणि मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सकाळी 7.00 ते सायंकाळी 4.00 या वेळेत करण्यात येणार आहे. सकाळी 7.00 वाजता उद्घाटन समारंभाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. सकाळी 8.00 वाजल्यापासून सहभागी नागरिकांना मोफत नाचणी माल्टचे वाटप करण्यात येईल. सकाळी 8.30 वाजल्यापासून नागरिकांसाठी मोफत प्राकृतिक चिकित्सा सल्ला, रक्तदाब तपासणी आणि उपचार सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.
यावेळी संस्थेच्या विविध विभागांच्या वतीने विशेष माहितीपर स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून रुग्णालयातील सेवा, विविध उपचारपद्धती आणि आरोग्यविषयक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. सकाळी 10.00 ते दुपारी 02.00 या वेळेत वैध फूड कूपनच्या आधारे सहभागी नागरिकांना मोफत मिलेट खिचडीचे वाटप करण्यात येईल. आरोग्य शिबिर आणि विभागनिहाय जनजागृती उपक्रम उपलब्ध व्यवस्थेनुसार सायंकाळी 04.00 वाजेपर्यंत सुरू राहतील.
महोत्सवादरम्यान हायड्रोथेरपी पॅक्स, डोळे व पोटासाठी मड पॅक्स, कंस मसाज, फूट मसाजर थेरपी आणि रक्ताभिसरणासाठी मसाजर थेरपी अशा विविध प्राकृतिक चिकित्सा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय, प्राकृतिक चिकित्सा दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना बाह्यरुग्ण विभागातील प्राकृतिक चिकित्सा उपचारांवर 25 टक्के विशेष सवलत देण्यात येणार आहे.
सर्व उपचार वैद्यकीय सल्ला, संबंधित व्यक्तीची आरोग्यस्थिती व वैद्यकीय उपयुक्तता, उपलब्ध सुविधा आणि निर्धारित सुरक्षा नियमांच्या अधीन राहून दिले जातील.
राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थेच्या वतीने पुणे व परिसरातील नागरिक, विद्यार्थी, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा व आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये रुची असलेल्या सर्वांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण: निसर्ग ग्राम हॉस्पिटल, विद्या शिल्प पब्लिक स्कूलसमोर, येवलेवाडी, पुणे – 411048
अधिक माहितीसाठी 9511693564 या क्रमांकावर संपर्क साधावा.
पीआयबी पुणे | हर्षल आकुडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai