Posted On:
16 NOV 2026 8:23PM by PIB Mumbai
पणजी, 16 नोव्हेंबर 2026
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे (एमएसएमई) गोव्यातील एमएसएमई विकास व सुविधा कार्यालय (एमएसएमई -डीएफओ) 17 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रकला सभागृह , कला व संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन, पट्टो, पणजी, गोवा येथे व्यावसायिक जागरुकता कार्यक्रम आयोजित करणार आहे.
व्यावसायिकतेविषयी जागरुकता निर्माण करणे आणि उदयोन्मुख व्यावसायिकांना विशेषतः स्थानिक युवकांना स्वयंरोजगार व व्यवसाय यांचा कारकिर्दीची व्यवहार्य संधी म्हणून विचार करण्यास प्रोत्साहन देणे या उद्देशाने हा कार्यक्रम आखण्यात आला आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून एमएसएमई -डीएफओ गोवा 18 नोव्हेंबर 2026 पासून पर्यटन मार्गदर्शक याविषयी व्यवसाय व कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या युवकांना आवश्यक पर्यटन मार्गदर्शक कौशल्ये, गोव्याची समृद्ध संस्कृती व पर्यटन वारसा आणि प्रभावी संवाद कौशल्ये शिकविण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. यामुळे सहभागी युवकांना गोव्याच्या वाढत्या पर्यटन क्षेत्रात स्वयं रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी शोधण्यामध्ये मदत मिळेल.
चित्रकला हॉल, कला व संस्कृती संचालनालय, संस्कृती भवन, पट्टो, पणजी येथे गोवा सरकारच्या गोवा राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाच्या (जीएसआरएलएम) स्थानिक सहकार्याने कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित केले जाईल.
या उपक्रमातील सहभाग विनाशुल्क आहे. मात्र प्रवेशसंख्या मर्यादित असल्यामुळे मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
इच्छुक उमेदवारांनी विशेषतः गोव्यातील स्थानिक युवा व उदयोन्मुख व्यावसायिकांनी व्यावसायिक जागरुकता कार्यक्रमात सहभागी व्हावे आणि स्वयं रोजगाराच्या नव्या संधी शोधण्यासाठी व आपली कौशल्ये विकसित करण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहिती व नांवनोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी एमएसएमइ-डीएफओ, मडगांव, गोवा येथे संपर्क साधावा.
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai