Posted On:
17 NOV 2026 1:57PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी फिलीपिन्सचे अध्यक्ष महामहिम फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर यांच्या निमंत्रणावरून,आज मनिला येथे 23 व्या भारत-आसियान शिखर परिषदेत सहभागी झाले. 'नेव्हिगेटिंग अवर फ्युचर, टुगेदर' (आपल्या भविष्याची दिशा एकत्रितपणे ठरवूया ) या संकल्पनेअंतर्गत आसियानचे यशस्वी अध्यक्षपद भूषवल्याबद्दल आणि भारतासाठी 'कंट्री कोऑर्डिनेटर' (समन्वयक देश) म्हणून दिलेल्या सहकार्याबद्दल अध्यक्ष मार्कोस यांचे त्यांनी अभिनंदन केले.
शिखर परिषदेला संबोधित करताना, पंतप्रधानांनी आसियानसोबतच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला भारत देत असलेल्या महत्त्वावर भर दिला. आसियान आणि भारताने या प्रदेशात आणि त्या पलीकडे शांतता, स्थिरता आणि शाश्वतीसाठी काम केले पाहिजे असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारत मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि नियम- आधारित हिंद-प्रशांत क्षेत्रावर विश्वास ठेवतो, असे नमूद करून त्यांनी सांगितले की, या प्रदेशाचे भविष्य स्पर्धेवर नव्हे तर सहकार्यावर अवलंबून आहे,.
भारत आसियानच्या एकतेसाठी आणि केंद्रस्थानासाठी दृढपणे वचनबद्ध आहे यावर त्यांनी भर दिला. आसियान कम्युनिटी व्हिजन 2045 आणि विकसित भारत 2047 हे भारत आणि आसियानच्या जनतेच्या सामायिक आकांक्षा पूर्ण करण्यास मदत करतील.
ते पुढे म्हणाले की, जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत आणि आसियान यांच्यातील सामायिक मूल्ये, समान जागतिक दृष्टिकोन आणि दृढ सांस्कृतिक संबंधांनी या भागीदारीला एक नवा आयाम दिला आहे. भारताच्या 'ॲक्ट ईस्ट' धोरणामुळे भारत-आसियान संबंधांना नवी गती मिळाली आहे असे त्यांनी सांगितले.
जगाच्या भविष्यासाठी तंत्रज्ञानाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. भारत आणि आसियान यांनी केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक बनू नये, तर त्यांनी तंत्रज्ञानाची सह -निर्मिती करावी आणि आपल्या लोकांच्या कौशल्य विकासासाठी एकत्रितपणे काम करावे यावर त्यांनी भर दिला .
पंतप्रधानांनी नमूद केले की, 2027 हे वर्ष भारत-आसियान संबंधांसाठी एक विशेष वर्ष असेल; या वर्षात दोन्ही देश त्यांच्यातल्या संबंधांची 35 वर्षे आणि 'सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी'ची 5 वर्षे साजरी करतील.
पंतप्रधानांनी भारत- आसियान संबंध अधिक दृढ करण्यासाठी विविध प्रस्ताव मांडले, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
● संपर्क व्यवस्था , वैज्ञानिक संशोधन, आपत्ती व्यवस्थापन, तटरक्षक दलांमधील सहकार्य, सागरी क्षेत्राबाबत जागरूकता आणि खलाशांची सुरक्षा वाढवण्याबाबत 'दीर्घकालीन आसियान-भारत सागरी सहकार्य योजना'.
● या प्रदेशात क्षमता बांधणीसाठी संयुक्त सायबर न्यायवैद्यक प्रशिक्षण कार्यक्रम;
● आसियान- भारत अणुऊर्जा तांत्रिक देवाणघेवाण;
● आसियान- भारत अंतराळ हॅकाथॉन
● खाणकाम आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रात आसियान-भारत सहकार्य;
● युवा शिखर परिषद,युवा संसद सदस्यांची देवाणघेवाण आणि स्टार्टअप हॅकाथॉनच्या माध्यमातून आसियान-भारत युवा संपर्क;
● नालंदा विद्यापीठात आसियान देशांसाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ;
● वेव्ह्ज 2027 मध्ये 'आसियान- भारत क्रिएटिव्ह पार्टनरशिप पॅव्हेलियन'; आणि
● आसियान देशांतील पर्यटकांसाठी मोफत ई-व्हिसा.
शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी फिलीपिन्सच्या अध्यक्षांचे आभार मानले आणि आसियानचे आगामी अध्यक्ष म्हणून सिंगापूरच्या पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या.
नेत्यांनी 'आपत्ती व्यवस्थापनातील सहकार्याबाबत आसियान-भारत संयुक्त निवेदन' स्वीकारले[लिंक] . पंतप्रधानांचे प्रारंभिक संबोधन येथे पाहता येईल [लिंक].
***
Nilima Chitale / Sushma Kane / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai