वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि इजिप्त यांनी द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्य मजबूत करण्याप्रती बांधिलकीला दुजोरा दिला

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांचा इजिप्त दौरा संपन्न

Posted On: 17 NOV 2026 10:05AM by PIB Mumbai

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी 15 ते 16 नोव्हेंबर 2026 या कालावधीत अरब प्रजासत्ताक इजिप्तला दिलेल्या अधिकृत भेटीचा समारोप झाला. केंद्रीय मंत्री गोयल यांची एखाद्या आफ्रिकी देशाला दिलेली ही पहिलीच द्विपक्षीय भेट होती. या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी अनेक उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका घेतल्या, भारत-इजिप्त संयुक्त व्यापार समिती (जेटीसी)च्या सातव्या सत्राचे सहअध्यक्षपद भूषवले, व्यवसायविषयक उपक्रमांमध्ये भाग घेतला तसेच भारतीय आणि इजिप्तमधील उद्योग समुदायांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

भारत आणि इजिप्त यांच्यादरम्यान ऐतिहासिक, नागरी सभ्यताविषयक तसेच दोन्ही देशाच्या लोकांमधील नातेसंबंध यांच्यात रुजलेले दीर्घकालीन संबंध आहेत आणि ते राजकीय, आर्थिक, सुरक्षाविषयक तसेच सांस्कृतिक सहकार्याचा समावेश असलेल्या बहुआयामी भागीदारीमध्ये परिवर्तीत झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारत-इजिप्त संबंधांना नवी गती मिळाली असून, त्यामुळे द्विपक्षीय संबंधांची पातळी, राजकारण, सुरक्षा, उर्जा तसेच आर्थिक क्षेत्रांमध्ये वाढीव सहकार्याच्या सामायिक कटिबद्धतेसह धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावली आहे.

केंद्रीय मंत्री गोयल गोयल यांच्या या दौऱ्यामध्ये भारत-इजिप्त जेटीसीची सातवी बैठक, भारत-इजिप्त संयुक्त व्यापारी मंडळ (जेबीसी) आणि व्यापारी मंच यांची बैठक तसेच भारत-इजिप्त स्टार्ट-अप मंचाची बैठक इत्यादी कार्यक्रमांचा समावेश होता. सदर इजिप्त भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी इजिप्तचे पंतप्रधान डॉ.मुस्तफा मडबौली यांची भेट घेतली, इजिप्तच्या मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि इजिप्तमधील आघाडीच्या उद्योग धुरिणांची भेट घेतली.

या दौऱ्यामुळे प्रदीर्घ काळापासून चालत आलेल्या भारत-इजिप्त आर्थिक भागीदारीला नवी गती मिळाली आणि दोन्ही देशांनी द्विपक्षीय व्यापाराचा विस्तार, गुंतवणुकीला चालना, औद्योगिक सहकार्याला बळकटी आणि दोन्ही देशांमधील उद्योगांतील संबंधांमध्ये सुधारणा करण्याप्रती बांधिलकीला दुजोरा दिला. वस्तू, सेवा आणि गुंतवणूक यांच्या संदर्भात दोन्ही बाजूंचे फायदे निश्चित केल्यानंतर, परस्पर लाभदायक पीटीए/एफटीए किंवा सीईपीए हे करार करण्यासाठीच्या संदर्भित अटींसाठी पद्धती तसेच आराखडा यांची चर्चा करण्यासाठी एका कृतिगटाची स्थापना करण्याबाबत दोन्ही देशांचे एकमत झाले.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल तसेच इजिप्तचे गुंतवणूक आणि परदेश व्यापार मंत्री डॉ.मोहम्मद फरीद सलेह यांच्या सह-अध्यक्षपदात दिनांक 15 नोव्हेंबर 2026 रोजी भारत-इजिप्त संयुक्त व्यापार समितीच्या 7 व्या सत्राची बैठक पार पडली. दोन्ही देशांमधील आर्थिक तसेच व्यापारी सहभागाचे वाढते महत्त्व दर्शवत या जेटीसीचा स्तर मंत्रीस्तरीय पातळीपर्यंत उंचावण्यात आला.

दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय व्यापारातील प्रगतीचा आढावा घेतला आणि द्विपक्षीय व्यापार 12 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्याचे मान्य केले. व्यापाराच्या प्रकारांमध्ये वैविध्य आणण्याचे, उच्च मूल्य-वर्धित निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे, बाजारपेठेची उपलब्धता मजबूत करण्याचे तसेच व्यापाराशी संबंधित आव्हानांचा सामना करण्याचे महत्त्व त्यांनी ठळकपणे नमूद केले.

एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत विविध वस्तूंचा व्यापार, गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील व्यापारापेक्षा 64 टक्क्यांची वाढ नोंदवत 5.04 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताकडून इजिप्तला झालेली निर्यात 3.87 अब्ज डॉलर्स इतकी होती तर इजिप्तकडून भारतात झालेली आयात 2.60 अब्ज डॉलर्स इतकी होती. (स्त्रोत: डीजीसीआयएस)

केंद्रीय मंत्री गोयल यांच्या इजिप्त भेटीदरम्यान, कृषी तसेच पशुवैद्यकीय सहकार्य, औषधे आणि आरोग्यसुविधा, अभियांत्रिकी वस्तू, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स, खते, वस्त्र-प्रावरणे, एमएसएमईज, सीमाशुल्क, सेवा, नवीकरणीय उर्जा, हरित हायड्रोजन, अन्न सुरक्षा, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स यांसह विस्तृत श्रेणीतील विविध घटकांवर चर्चा झाली. व्यापारी शिष्टमंडळांची नियमित देवाणघेवाण, खरेदीदारांचे दौरे, व्यापारी प्रदर्शने तसेच व्यावसायिक जुळवणीविषयक उपक्रम यांचे महत्त्व दोन्ही बाजूंनी अधोरेखित केले.

इजिप्तच्या निर्यात आणि आयात विषयक नियान्त्रानासाठीच्या सामान्य संस्थेकडे (जीओईआयसी) भारतीय टाईल्स कंपन्यांची नोंदणी, थकीत व्यावसायिक भरणा रकमा, व्यापारातील उपाययोजना तसेच इजिप्तच्या सार्वजनिक खरेदी निविदा प्रकियेत भारतीय कंपन्यांचा सहभाग यांच्याशी संबंधित समस्यांवर दोन्ही बाजूंनी चर्चा केली. प्रमाणीकरण आणि अनुरूपता मूल्यांकन यामधील सहकार्य, कृषी बाजारपेठांची उपलब्धता, पशुवैद्यकीय सेवा तसेच भारतीय उत्पादनांचे मानांकन या विषयांवर देखील चर्चा करण्यात आल्या.

दोन्ही देशांनी इजिप्तमधील, विशेषतःसुवेझ कालवा आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूक संधींचा आढावा घेतला. सध्या सुमारे 70 भारतीय कंपन्या इजिप्तमध्ये कार्यरत असून त्यांची गुंतवणूक अंदाजे 5 अब्ज डॉलर्सपर्यंत आहे. वाहन उद्योग आणि वाहनांचे सुटे भाग, औषधे, रसायने, वस्त्र-प्रावरणे, अन्न प्रक्रिया, अभियांत्रिकी, नवीकरणीय उर्जा आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या क्षेत्रांतील गुंतवणुकीच्या संधींमध्ये भारताच्या अधिक सहभागाचे इजिप्तने स्वागत केले.

नवीकरणीय उर्जा, हरित हायड्रोजन, औषधे, खते, वस्त्र-प्रावरणे, वाहनांचे सुटे भाग तसेच डिजिटल परिवर्तना यांसारख्या क्षेत्रांमध्ये औद्योगिक भागीदारी तसेच संयुक्त उपक्रमांना अधिक प्रोत्साहन देण्याबाबत देखील दोन्ही बाजूंचे एकमत झाले. दोन्ही देशांनी डिजिटल तंत्रज्ञान आणि वित्ततंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये भारताचे युपीआय आणि इजिप्तचे इन्स्टापेया प्रणालींच्या जोडणीतील, निर्यातीत वाढ करण्यात स्थानिक चलनाच्या वापराची व्यापारातील सकारात्मक भूमिका तसेच इजिप्तच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा (डीपीआय) वापर करून घेण्यातील क्षमता

भारत-इजिप्त संयुक्त व्यापार समितीच्या 7 व्या बैठकीच्या सहमत इतिवृत्तावर दोन्ही मंत्र्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. जेटीसीची यानंतरची बैठक, वर्ष 2028 मध्ये नवी दिल्ली येथे अथवा त्यापूर्वी परस्पर सोयीच्या दिवशी होईल.

भेटीच्या पहिल्या दिवशी पियुष गोयल, इजिप्तचे गुंतवणूक आणि परराष्ट्र व्यापार मंत्री डॉ. मोहम्मद फरीद सालेह यांच्यासह 'भारत-इजिप्त संयुक्त व्यापार परिषदे'च्या सहाव्या बैठकीत आणि 'भारत-इजिप्त व्यापार मंचा'त सहभागी झाले. संयुक्त व्यापार परिषदेच्या बैठकीत भारतीय आणि इजिप्शियन व्यावसायिक समुदायांचे 250 हून अधिक प्रतिनिधी एकत्र आले, या बैठकीमुळे व्यापार, गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्याच्या नव्या संधी शोधण्याची संधी मिळाली.

चर्चेत रसायने आणि पेट्रोकेमिकल्स, औषधनिर्मिती आणि आरोग्यसेवा, अन्न प्रक्रिया आणि कृषी व्यवसाय, नूतनीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन, पायाभूत सुविधा, बंदर आणि लॉजिस्टिक्स, आयटी आणि डिजिटल तंत्रज्ञान, कापड आणि ऑटोमोटिव्ह या क्षेत्रांचा समावेश होता. भारत-इजिप्त व्यापार मंचाने क्षेत्रीय संधी, गुंतवणुकीच्या शक्यता आणि व्यावसायिक भागीदारी या विषयांवरील चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या संवादांनी द्विपक्षीय आर्थिक संबंधांच्या संभाव्यतेला ठोस व्यावसायिक परिणामांमध्ये रूपांतरित करण्यासाठी खासगी क्षेत्राच्या अधिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

16 नोव्हेंबर 2026 रोजी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी भारत-इजिप्त स्टार्टअप्स फोरममध्ये भाग घेतला, यात इजिप्तचे नियोजन आणि आर्थिक विकास मंत्री डॉ. अहमद रोस्तोम सहभागी झाले. या फोरममध्ये दोन्ही देशांमधील स्टार्टअप्स, इनक्यूबेटर्स, ॲक्सिलरेटर्स, व्हेंचर गुंतवणूकदार आणि संबंधित सरकारी संस्थांचे प्रतिनिधी एकत्र आले.

या मंचाने सुमारे 50 भारतीय आणि इजिप्शियन स्टार्टअप्सना आपल्या नाविन्यपूर्ण परिसंस्था सादर करण्यासाठी, अनुभवंची देवाणघेवाण करण्यासाठी आणि निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या मंचाचा एक भाग म्हणून, पियुष गोयल यांनी स्टार्टअप्ससाठी एका गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेदरम्यान त्यांनी इजिप्तचे नियोजन आणि आर्थिक विकास मंत्री डॉ. अहमद रोस्तोम यांच्यासह भारतीय आणि इजिप्शियन स्टार्टअप्सच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. भारतीय संस्थापकांनी इजिप्शियन बाजारपेठेसाठी आपली उत्पादने आणि सेवा सादर केल्या आणि त्यांना अपेक्षित असलेल्या सहकार्याचा तपशील दिला, यात वितरण भागीदार, प्रायोगिक प्रकल्प, प्रमाणपत्रे आणि स्थानिक उत्पादनाशी संबंधित बाबींचा समावेश होता. त्यांनी संबंधित क्षेत्रांतील आपल्या इजिप्शियन समकक्षांशीही संवाद साधला.

या भेटीदरम्यान, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी इजिप्तचे पंतप्रधान डॉ. मुस्तफा मदबूली यांची भेट घेतली. त्यांनी इजिप्तचे गुंतवणूक आणि परराष्ट्र व्यापार मंत्री डॉ. मोहम्मद फरीद सालेह, उद्योग मंत्री इंजिनिअर खालिद हाशेम, परराष्ट्र व्यवहार, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि परदेशस्थ इजिप्शियन नागरिक व्यवहार मंत्री डॉ. बद्र अब्देलअत्ती, नियोजन आणि आर्थिक विकास मंत्री डॉ. अहमद रोस्तोम, तसेच परिवहन मंत्री लेफ्टनंट जनरल इंजिनिअर कामेल वझीर यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठकाही घेतल्या.

या चर्चेत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक संबंध मजबूत करण्यावर, औद्योगिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यावर, व्यावसायिक गुंतवणूक सुलभ करण्यावर आणि परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये नवीन संधी शोधण्यावर भर देण्यात आला. बंदर आधुनिकीकरण, जहाज बांधणी, ग्रीनफील्ड आणि ब्राउनफील्ड विमानतळ विकास, तसेच परवडणाऱ्या, उच्च दर्जाच्या मेट्रो रेल्वे प्रणालींचे बांधकाम या मुद्द्यांचा यात समावेश आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी इजिप्शियन व्यावसायिक नेते आणि निवडक इजिप्शियन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी देखील संवाद साधला, गुंतवणूक, भागीदारी आणि दोन्ही देशांमधील व्यवसाय विस्ताराच्या संधी शोधणे, हे याचे उद्दिष्ट होते.

या भेटीचा भाग म्हणून, भारतीय व्यावसायिक प्रतिनिधी मंडळाने आफ्रिकन एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक (अफ्रेक्सिमबँक) च्या प्रतिनिधींशी संवाद साधला. या चर्चेत बँकेचे उपक्रम आणि संभाव्य सहभागाच्या क्षेत्रांचा समावेश होता, यात प्रकल्प तयारी, प्रकल्प वित्तपुरवठा, सल्लागार सेवा आणि भांडवली बाजार, निर्यात विकास, औद्योगिक उद्याने आणि आफ्रिका ट्रेड गेटवे याचा समावेश होता. या संवादातून आफ्रिकन बाजारपेठांमध्ये भारतीय व्यवसायांचा सहभाग सुलभ करण्याच्या मार्गांचा शोध घेण्याची आणि बँकेबरोबर सहकार्याची संभाव्य क्षेत्रे निश्चित करण्याची संधी मिळाली.

पियुष गोयल यांनी 'इजिप्शियन ज्युनियर बिझनेसमेन असोसिएशन' च्या सदस्यांशी संवाद साधला. या असोसिएशनमध्ये इजिप्तमधील प्रमुख कौटुंबिक व्यवसायांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीतील उद्योजकांचा समावेश आहे. या संवादादरम्यान इजिप्तमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांचे प्रतिनिधी आणि त्यांच्याबरोबर आलेले भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळही उपस्थित होते. या संवादात उद्योजकीय संबंध दृढ करण्यावर, भागीदारीला प्रोत्साहन देण्यावर आणि द्विपक्षीय व्यावसायिक सहकार्यासाठी नवीन संधी शोधण्यावर भर देण्यात आला.

या भेटीदरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी 14 नोव्हेंबर 2026 रोजी ‘इंडियन कम्युनिटी असोसिएशनने’ आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, इजिप्तमधील भारतीय समुदाय आणि भारतीय व्यावसायिक समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधला. दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये आणि व्यावसायिक संबंध दृढ करण्यामध्ये भारतीय समुदायाने दिलेल्या योगदानाची त्यांनी दखल घेतली.

इजिप्शियन नेते आणि व्यावसायिक समुदायाबरोबर संवाद साधताना पियुष गोयल यांनी त्यांना गुजरातमधील गांधीनगर येथे होणाऱ्या 'व्हायब्रंट गुजरात समिट 2027' मध्ये आणि नवी दिल्ली येथे 4 ते 9 फेब्रुवारी 2027 दरम्यान होणाऱ्या 'भारत मोबिलिटी 2027' मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले.

भारत आणि इजिप्त यांच्यात दीर्घकाळापासून ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध आहेत. 2023 मध्ये सुरू झालेल्या भारत–इजिप्त धोरणात्मक भागीदारीने व्यापार, गुंतवणूक, उद्योग आणि इतर परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी भक्कम पाया तयार केला. या भेटीमुळे द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, औद्योगिक भागीदारी, नवोन्मेष आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही देशांची सामायिक वचनबद्धता पुन्हा अधोरेखित झाली.

*****

Nitin Fulluke / Sanjana Chitnis / Rajashree Agashe / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2337485) अभ्यागत कक्ष : 16