Posted On:
17 NOV 2026 8:22PM by PIB Mumbai
केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांच्या सहकार्याने, 15 नोव्हेंबर 2026 रोजी 'धरती आबा' भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त देशभरात 'जनजातीय गौरव दिवस' साजरा केला. या दिवशी 'जनजातीय गौरव पंधरवड्या'चा (1 ते 15 नोव्हेंबर 2026 ) समारोप झाला. या काळात देशभरातील आदिवासी भागांमध्ये विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, कल्याणकारी आणि जनसंपर्क उपक्रम राबवण्यात आले.
नवी दिल्लीत या उत्सवाची सुरुवात झाली. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जाणाऱ्या 'जनजातीय गौरव दिनी संसदेच्या परिसरातील 'प्रेरणा स्थळ' येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांना पुष्पांजली अर्पण केली.


या निमित्ताने मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम महाराष्ट्रातील गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. तसेच, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुएल ओराम, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, आदिवासी व्यवहार राज्यमंत्री दुर्गादास उईके आणि इतर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पंतप्रधानांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. सकाळी महाराष्ट्र शासनाने 22 आश्रमशाळा आणि 51 वसतिगृहांचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी विविध राज्यांमधील सुमारे 3 हजार कोटी रुपये खर्चाच्या 246 प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि या प्रकल्पांची पायाभरणी केली.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी ‘जोहार’ असे म्हणत सर्वांना अभिवादन केले. भगवान बिरसा मुंडा यांच्यासह गडचिरोलीतील राघोजी भांगरे, भागोजी नाईक आणि वीर बाबुराव शेडमाके या आदिवासी वीरांना त्यांनी अभिवादन केले. 15 नोव्हेंबर 2021 रोजी पहिल्यांदा साजरा झालेला जनजातीय गौरव दिवस आता राष्ट्रीय उत्सव बनला आहे. आज देश स्वदेशी स्वाभिमानाच्या भावनेतून आपला वारसा, इतिहास आणि वीरांचे स्मरण करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.


गेल्या 12 ते 13 वर्षांत देशातील जवळपास 50 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर आले आहेत, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. तसेच देश नक्षलवाद आणि माओवादी दहशतीपासून मुक्त झाला आहे. आदिवासी समाजाशी संबंधित या दोन मोठ्या राष्ट्रीय उपलब्धी आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.


स्वातंत्र्यानंतर ज्या कुटुंबांना सरकारी सुविधा सर्वात शेवटी मिळाल्या, त्यांना आता सर्वात आधी या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने पीएम-जनमन आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानासाठी 1 लाख कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुख्यमंत्री, राज्यपाल आणि मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात आले.
***
Madhuri Mayekar / Sushma Kane / Raj Dalekar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai