Posted On:
19 NOV 2026 9:39PM by PIB Mumbai
पुणे, 19 नोव्हेंबर 2026
राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत (National River Conservation Plan) पुणे शहरात राबविण्यात येत असलेल्या मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाचा (PARMM – Pollution Abatement of River Mula-Mutha at Pune) आढावा घेण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री मा. श्री. सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था (CWPRS), खडकवासला, पुणे येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ (सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्रालय), केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री मा. डॉ. राज भूषण चौधरी, पुण्याच्या महापौर मा. श्रीमती मंजुश्री नागपुरे, पुणे महानगरपालिकेच्या सभासद मा. श्रीमती धनश्री दत्ताभाऊ कोल्हे, महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम, केंद्रीय सहसचिव (NRCD) श्री. पवन कुमार, जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार, अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर तसेच पुणे महानगरपालिकेचे श्रीमती मनिषा शेकटकर,मुख्य अभियंता, श्री.संजय गायकवाड, अधीक्षक अभियंता व मलनिःसारण विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये मुळा-मुठा नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाची सद्यस्थिती, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची उभारणी, सांडपाणी वाहिन्यांचे जाळे, प्रकल्पांची कालमर्यादा, बांधकाम व देखभाल खर्च तसेच प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. नवल किशोर राम यांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर सादरीकरण केले. यामध्ये पुणे शहरातील सांडपाणी निर्मिती, उपलब्ध प्रक्रिया क्षमता, मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची (STP) उभारणी आणि नदी प्रदूषण नियंत्रणासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
आयुक्तांनी सांगितले की, पुणे शहरात दररोज सुमारे 980 एमएलडी सांडपाण्याची निर्मिती होते. त्यापैकी सध्या 591 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता महानगरपालिकेकडे उपलब्ध असून, एकूण निर्मितीच्या सुमारे 60 टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात आहे. उर्वरित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध नवीन एसटीपी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
केंद्र शासनाच्या अर्बन चॅलेंज फंड, अमृत योजना, हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल (HAM) तसेच महानगरपालिकेच्या स्वनिधीतून एकूण 535 एमएलडी क्षमतेचे नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या PRAMM प्रकल्पांच्या माध्यमातून मार्च 2027 पर्यंत अतिरिक्त २८५ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
अतिरिक्त महापालिका आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांनी प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती देताना सांगितले की, प्रकल्पांतर्गत एकूण 396 एमएलडी क्षमतेच्या 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांपैकी 111एमएलडी क्षमतेच्या पाच केंद्रांची कामे पूर्ण झाली असून, उर्वरित केंद्रांची कामे प्रगतिपथावर आहेत. बॉटनिकल गार्डन एसटीपी वगळता उर्वरित एसटीपींची कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच भैरोबा एसटीपी येथे गॅस इंजिनच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचे नियोजन आहे. सांडपाणी वाहिन्यांची कामे ऑक्टोबर २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बैठकीमध्ये एसटीपी प्रकल्पांची सद्यस्थिती, सांडपाणी वाहिन्यांची कामे, तांत्रिक अडचणी, SCADA प्रणालीद्वारे देखरेख, GIS मॅपिंग तसेच जनजागृती व लोकसहभाग या विषयांचाही आढावा घेण्यात आला. नदी स्वच्छतेसाठी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या नदी महोत्सव आणि विविध जनजागृती उपक्रमांची माहितीही यावेळी सादर करण्यात आली.
यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री मा. श्री. सी. आर. पाटील यांनी एसटीपी प्रकल्पांच्या उभारणीसाठी येणारा बांधकाम खर्च तसेच देखभाल व दुरुस्तीवरील (Operation and Maintenance) खर्चाबाबत माहिती घेतली. नमामि गंगे कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पांचा संदर्भ देत एसटीपी प्रकल्पांचा बांधकाम खर्च अधिक किफायतशीर ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, तसेच देखभाल व दुरुस्तीवरील खर्च कमी करण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
एसटीपी प्रकल्पांच्या निविदा व करारामध्ये सात वर्षांच्या कालावधीत आवश्यकतेनुसार यांत्रिक यंत्रसामग्री व उपकरणे बदलणे आणि त्यांचे अद्ययावतीकरण करणे यांचा समावेश असावा, असे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी दिले. तसेच प्रकल्पांच्या कामाची गुणवत्ता राखणे आणि निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करणे यासाठी निविदांमध्ये योग्य प्रोत्साहनपर तरतुदींचा (Incentive Provisions) समावेश करण्याबाबतही त्यांनी सूचित केले.
केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले की, या प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मुळा-मुठा नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून, नदीच्या पुनरुज्जीवनाचे कामही हाती घेण्यात येणार आहे. यामुळे नदीचे पर्यावरणीय संतुलन सुधारण्यासोबतच पुणे शहरातील नागरिकांना स्वच्छ व प्रदूषणमुक्त नदीचा लाभ मिळणार आहे.
महापौर मा. श्रीमती मंजुश्री नागपुरे यांनी नमूद केले की, मुळा-मुठा नदीचे प्रदूषण रोखणे आणि नदीचे पुनरुज्जीवन करणे ही पुणे शहराच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त करण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, नदीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पुणे महानगरपालिका कटिबद्ध आहे.
बैठकीनंतर केंद्रीय मंत्री महोदयांसह उपस्थित मान्यवरांनी वडगाव येथील 26 एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत केंद्रीय मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले. प्रक्रिया केलेल्या पाण्याची गुणवत्ता चांगली असून, त्याचा पुनर्वापर करणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः उद्याने, बांधकाम, हरित क्षेत्रे तसेच इतर बिगर-पिण्याच्या वापरासाठी या पाण्याचा उपयोग करण्याबाबत नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यामुळे पिण्याच्या पाण्यावरील अवलंबित्व कमी होण्यासोबतच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर आणि जलसंधारणाला चालना मिळणार आहे.
या सर्व प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मुळा-मुठा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध सांडपाण्याचे प्रमाण कमी होऊन नदी प्रदूषण नियंत्रणास मदत होणार आहे. परिणामी, नदीच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला गती मिळून नदीचे पर्यावरणीय संतुलन पुनर्स्थापित करण्यास हातभार लागणार आहे. तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुनर्वापरामुळे जलसंपत्तीचे संवर्धन होऊन पुणे शहरातील नागरिकांना स्वच्छ व प्रदूषणमुक्त नदीचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.


_20261119214411_49dfa0.jpeg)

_20261119214448_6bdc51.jpeg)



पुणे महानगरपालिका मलनिःसारण विभाग/ पीआयबी पुणे | हर्षल आकुडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai