Posted On:
22 NOV 2026 8:16PM by PIB Mumbai
पुणे, दिनांक 22 नोव्हेंबर 2026
देशातील हातमाग (हँडलूम), हस्तकला (हँडीक्राफ्ट) आणि तांत्रिक वस्त्रोद्योग (टेक्निकल टेक्सटाईल) क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. देशातील विणकर आणि कारागिरांचे मासिक उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष रोडमॅप तयार करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी पुण्यात दिली.

त्यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान सर्किट हाऊस येथे आयोजित एका विशेष बैठकीत त्यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाशी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आणि स्थानिक महिला कारागिरांशी संवाद साधत त्यांच्या कलेचे कौतुक केले.

या आढावा बैठकीला वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय, विकास आयुक्त (हस्तकला व हातमाग), केंद्रीय रेशीम मंडळ आणि वस्त्रोद्योग समितीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांनी खालील महत्त्वाचे निर्देश दिले:
- उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट: हस्तकला कारागिरांचे किमान मासिक उत्पन्न 15 हजार रुपये, तर विणकरांचे उत्पन्न 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत नेण्यासाठी विभागाने ठोस पावले उचलावीत.
- पथदर्शी प्रकल्प (Pilot Projects): मुंबईतील 'विणकर सेवा केंद्रा'मार्फत (WSC) 'गुवाहाटी मॉडेल'च्या धर्तीवर महाराष्ट्रात दोन विशेष प्रकल्प राबवले जाणार आहेत. यामध्ये येवला येथील 'पैठणी साडी' आणि नागपूर येथील 'करवत साडी' यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल.
- किमान 10 कारागिरांसोबत काम करणाऱ्या 'कारागीर-नि-उद्योजकांची' राज्यनिहाय यादी तयार करणे आणि बाजारपेठेत सर्वाधिक मागणी असलेल्या उत्पादनांची निवड करणे.
टेक्निकल टेक्सटाईलमध्ये भारताची गरुडझेप:
तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रगतीबद्दल माहिती देताना गिरीराज सिंह यांनी सांगितले की, पूर्वी आयात कराव्या लागणाऱ्या अनेक वस्तूंची आता देशातच निर्मिती होत आहे. डायपर आणि सॅनिटरी नॅपकिनसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाबाबतही भारत स्वावलंबी झाला आहे. सध्या भारताचे टेक्निकल टेक्सटाईल उत्पादन 4 अब्ज डॉलरवर पोहोचले असून, कृषी, वैद्यकीय, बांधकाम, वाहन आणि मोबाईल अशा 12 प्रमुख क्षेत्रांमध्ये याचा वापर होत आहे. विशेष म्हणजे, औद्योगिक पॅकेजिंग उत्पादनांच्या निर्यातीत भारताने चीनलाही मागे टाकले आहे. या क्षेत्रातील प्रगत संशोधनासाठी पुण्यातील 'नॅशनल केमिकल लॅबोरेटरी'ची (NCL) मदत घेतली जात आहे.
देशाच्या एकूण वस्त्रोद्योग क्षेत्राला 350 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. यामध्ये 100 अब्ज डॉलरची निर्यात आणि 250 अब्ज डॉलरची देशांतर्गत बाजारपेठ विकसित करण्याचे नियोजन आहे. 2014 मध्ये 138 अब्ज डॉलर असलेली देशाची वस्त्रोद्योग बाजारपेठ आता 190 अब्ज डॉलरवर पोहोचली असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.


***
हर्षल अकुडे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com