57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार – डॉ. किरण कुलकर्णी


इफ्फीतील परिसंवादात महाराष्ट्राच्या चित्रपट क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि विकासाच्या दिशेवर चर्चा

Posted On: 23 NOV 2026 8:34PMby PIB MumbaiRelease ID: 2340596Views: 21

गोवा, 23 नोव्‍हेंबर 2026

 

महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार असून, कमी बजेटच्या चित्रपटांना अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवी व्यवस्था विकसित करण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिली.

गोवा येथे सुरू असलेल्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत (इफ्फी) वेव्हज् फिल्म बझारमध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, दिग्दर्शक निखिल महाजन, महेश लिमये आणि सुहृद गोडबोले सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात चित्रपट चित्रीकरणासाठी परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक खिडकी प्रणाली कार्यरत असून, सात दिवसांत विविध विभागांच्या परवानग्या देण्याची सुविधा उपलब्ध आहे. या माध्यमातून आतापर्यंत सुमारे पाच हजार परवानग्या देण्यात आल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

कमी बजेटच्या चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये मर्यादित शो आणि तिकीटदरांमुळे भेडसावणाऱ्या अडचणींवर तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाय शोधण्यात येत असून, त्यासाठी लवकरच सक्षम यंत्रणा विकसित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीच्या माध्यमातून भारतीय चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र सहकार्य यंत्रणा उभारावी, अशी अपेक्षा दिग्दर्शक निखिल महाजन यांनी व्यक्त केली.

महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांच्या सूचनांनुसार चित्रपट क्षेत्रातील बदलत्या गरजांसाठी सुविधा विकसित करण्यावर भर असल्याचे सांगितले.

महेश लिमये यांनी महाराष्ट्रातील चित्रीकरण स्थळांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन करताना, चित्रीकरणानंतर स्थळांची स्वच्छता व मूळ स्थिती राखण्याची जबाबदारी निर्मात्यांनी घ्यावी, असे नमूद केले. तर सुहृद गोडबोले यांनी तरुण निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी होण्यासाठी महामंडळाकडून मिळणाऱ्या संधींचे महत्त्व अधोरेखित केले.

या परिसंवादाचे सूत्रसंचालन चित्रपट अभ्यासक व दिग्दर्शक डॉ. संतोष पाठारे यांनी केले.

 

* * *

पीआयबी मुंबई | शिल्पा नीलकंठ/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2340596
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026