मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

टपाल विभागाच्या इस्टेट्स मॅनेजमेंट या मालमत्ता व्यवस्थापन योजनेला मुदतवाढ; 1,491 कोटी रुपयांच्या खर्चास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 25 NOV 2026 8:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने टपाल विभागाच्या ‘मालमत्ता व्यवस्थापन योजना’ (Estates Management Scheme) पुढे सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. 16 व्या वित्त आयोगाच्या कालावधीत, म्हणजेच आर्थिक वर्ष 2026-27 ते 2030-31 या पाच वर्षांसाठी ही योजना सुरू राहणार आहे. या योजनेसाठी एकूण 1,491 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

धोरणात्मक उद्दिष्ट:

टपाल विभागाच्या मालमत्ता आणि पायाभूत सुविधांचे व्यापक आधुनिकीकरण करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामध्ये भारतातील ऐतिहासिक वारसा असलेल्या टपाल इमारतींचे जतन करणे, तसेच टपाल कार्यालये आणि निवासी वसाहतींचे बांधकाम, पुनर्बांधणी व नूतनीकरण करणे यावर भर देण्यात आला आहे. या सर्व इमारतींना एकसमान स्वरूप देण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. डिजिटल इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनांशी सुसंगत असलेली ही आधुनिकीकरण योजना टपाल सेवांच्या सुरुवातीच्या टप्प्यातील वितरण व्यवस्थेला (फर्स्ट-माईल डिलिव्हरी) बळ देईल. तसेच, आर्थिक समावेशनाला चालना देऊन देशभरातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार सेवा पुरवण्यास मदत करेल.

1.65 लाख टपाल कार्यालयांचे जाळे असलेले ‘इंडिया पोस्ट’ (भारतीय टपाल सेवा),  जगातील सर्वात मोठ्या टपाल सेवा जाळ्यापैकी एक आहे. यापैकी 1,49,385 टपाल कार्यालये ग्रामीण भागात आहेत. टपाल सेवा, बँकिंग (POSB/IPPB), विमा (PLI), आधार सेवा, पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे तसेच डाकघर निर्यात केंद्रांच्या (DNKs) माध्यमातून ग्रामीण कारागिरांना मदत अशा विविध सेवा पुरवण्यात इंडिया पोस्ट महत्त्वाची भूमिका बजावते.

अंमलबजावणीचा कालावधी:

ही योजना आर्थिक वर्ष 2026-27 ते आर्थिक वर्ष 2030-31 पर्यंतच्या पाच वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबवण्याचे नियोजित आहे.

मंजूर योजनेचे प्रमुख घटक:

  • नवीन बांधकाम (280 कोटी रुपये): सध्या भाड्याच्या जागेत सुरू असलेली टपाल कार्यालये स्वतःच्या इमारतीत आणण्यासाठी विभागाच्या रिक्त भूखंडांवर 190 नवीन टपाल इमारती बांधणे. यामुळे भाड्यापोटी द्यावा लागणारा खर्चही वाचेल.
  • पुनर्बांधणी (108 कोटी रुपये): दीर्घकालीन सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी 50 जीर्ण झालेल्या विभागीय टपाल इमारती पाडून त्यांच्या जागी नवीन इमारती बांधणे.
  • नूतनीकरण आणि ब्रँडिंग (318 कोटी रुपये): ‘एसपीए’ (SPA – स्पेस प्लॅनिंग अँड ॲलोकेशन) अर्थात जागेचे नियोजन आणि वाटपविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार 2,550 विभागीय उप-टपाल कार्यालयांचे आधुनिकीकरण करणे आणि त्यांना एकसमान स्वरूप देणे.
  • भाड्याच्या टपाल कार्यालयांचे अद्ययावतीकरण (37.50 कोटी रुपये): भाड्याच्या जागेत कार्यरत असलेल्या 2,500 टपाल कार्यालयांचे अद्ययावतीकरण करणे आणि त्यांना एकसमान स्वरूप देणे.
  • वारसा जतन (180 कोटी रुपये): विभागाचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी 20 महत्त्वाच्या ऐतिहासिक टपाल इमारतींचे जतन आणि संवर्धन करणे.
  • वसाहत नूतनीकरण (357.50 कोटी रुपये): कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि जीवनमान सुधारण्यासाठी अधिक मागणी असलेल्या 150 टपाल निवासी वसाहतींचे आधुनिकीकरण करणे.

पूरक आणि सर्वसमावेशक उपक्रम (100 कोटी रुपये): सुगम्य भारत अभियानांतर्गत सौरऊर्जा आणि पावसाचे पाणी साठवण्यासारख्या शाश्वत सुविधा विकसित करणे. तसेच, रॅम्प (चढउताराची सुविधा) आणि ब्रेलमधील सूचना फलक यांसारख्या सर्वांसाठी सुलभ पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे. याशिवाय, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि बालकांना स्तनपान करता यावे यासाठी स्वतंत्र कक्ष अशा सुविधांचाही समावेश करणे.

एकात्मिक तंत्रज्ञान केंद्र (100 कोटी रुपये): प्रगत टपाल तंत्रज्ञान (APT-ॲडव्हान्स्ड पोस्टल टेक्नॉलॉजी)) सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्वदेशी मुक्त स्रोत तंत्रज्ञान प्रणालीला (ओपन-सोर्स टेक स्टॅक) पाठबळ देण्यासाठी बंगळुरू येथे ‘टपाल तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्रा’ची (CEPT) कायमस्वरूपी इमारत उभारणे.

शैलेश पाटील/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2341561) अभ्यागत कक्ष : 8