Posted On:
26 NOV 2026 10:04PM by PIB Mumbai
नागपूर, 26 नोव्हेंबर 2026
शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती उपलब्ध करून देण्यासह बदलत्या हवामानाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविण्याच्या उद्देशाने आयोजित मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 'ॲग्रोव्हिजन 2026' आणि जलपरिषदेचा भव्य उद्घाटन सोहळा, शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
अमरावती रोडवरील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि ॲग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक नितीन गडकरी राहणार आहेत. जलपरिषदेचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच,आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था आयसीआरआयएसएटी, हैदराबादचे महासंचालक डॉ. हिमांशु पाठक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत.
'दुष्काळाचा सामना : पाणी व्यवस्थापन आणि पीक नियोजन' ही यंदाच्या ॲग्रोव्हिजनची मध्यवर्ती संकल्पना आहे. या चार दिवसीय कृषी महोत्सवात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि स्मार्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकात्मिक कृषी नियोजनावर विशेष भर देण्यात येणार आहे.
शिक्षण, प्रशिक्षण आणि सक्षमीकरण या त्रिसूत्रीवर गेली १६ वर्षे कार्यरत असलेल्या ॲग्रोव्हिजनने शेतकरी, कृषी तज्ज्ञ, संशोधक, उद्योजक, तंत्रज्ञान क्षेत्र आणि शासन यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण घडवून आणली आहे. कार्यशाळा, कृषी प्रदर्शन आणि परिसंवादांच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा प्रयत्न आहे.
विदर्भातील शेतकऱ्यांसमोरील दुष्काळाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी यंदा पाणी व्यवस्थापन, जलसंधारण आणि पीक नियोजन या विषयांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन, उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शेतीतील नव्या प्रयोगांबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कृषी क्षेत्रातील विविध विषयांवर या महोत्सवात विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
27 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता 'कृषी क्षेत्रातील स्टार्टअपस आणि माहिती तंत्रज्ञान' या विषयावर कार्यशाळा होणार आहे.
28 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता 'दुष्काळात पशुसंगोपन व चाऱ्याचे नियोजन' आणि दुपारी 2 वाजता 'बायोचार व सेंद्रिय घटकांद्वारे जमिनीतील कार्बन सुधारणा' या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता 'AI व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कमी पाण्यात ऊस उत्पादन' या विषयावरील कार्यशाळेला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजता 'गोड्या पाण्यातील मत्स्यपालन व विदर्भातील संधी' या विषयावरील कार्यशाळेला मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
कृषी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता 'विदर्भातील समूह आधारित उत्पादनांवर आधारित FPO' आणि दुपारी 2 वाजता 'दुष्काळात AI चा वापर करून संत्रा बागांचे नियोजन' या विषयांवर विशेष कार्यशाळा होणार आहेत.
राष्ट्रीय कृषी प्रदर्शन 27 ते 30 नोव्हेंबरदरम्यान दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 6 या वेळेत खुले राहणार आहे. या प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, नवीन उपकरणे, संशोधन, शेतीतील आधुनिक पद्धती आणि शेतीपूरक व्यवसायांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता ॲग्रोव्हिजन 2026 चा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शेतकऱ्यांनी या चार दिवसीय कृषी महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, आयोजन सचिव रवी बोरटकर व रमेश मानकर तसेच समितीच्या सदस्यांनी केले आहे.


सौरभ खेकडे/धनंजय वानखेडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai