57th International Film Festival of India 2026
20 – 28 Nov 2026

आपल्याला कुटुंब कोण बनवते? 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या समारोपीय चित्रपटातून नात्यांचा वेध


‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’च्या कलाकारांनी मोठे होत जाण्याचा प्रवास, जबाबदारीचा स्वीकार आणि मानवी नातेसंबंधाच्या शोधाबद्दल मांडले विचार

Posted On: 28 NOV 2026 3:48PMby PIB MumbaiRelease ID: 2343141Views: 24

गोवा, 28 नोव्‍हेंबर 2026

 

आपल्याला कुटुंब कोण बनवते - रक्ताचे नाते, एकच घर की माणसांनी एकमेकांशी हळूहळू विणलेले भावनिक बंध? हा प्रश्न 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोपीय चित्रपट असलेल्या ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’च्या केंद्रस्थानी आहे. अँथनी चेन दिग्दर्शित, मँडरीन आणि इंग्रजी भाषेतील या 157 मिनिटांच्या चित्रपटातून कौटुंबिक नातेसंबंध, प्रौढावस्थेतील अनिश्चितता आणि आपलेपणाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. सिंगापूरचे कलाकार कोह जिया लेर आणि रेजेन लिम यांनी आज गोव्यात, पत्र सूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत या चित्रपटाविषयी आपले विचार मांडले. 'इलो इलो' (2013) आणि 'वेट सीझन' (2019) या चित्रपटांनंतर चेन यांची 'ग्रोइंग अप' ही चित्रपट मालिका या चित्रपटाने पूर्ण झाली आहे.

हा चित्रपट समकालीन सिंगापूरच्या पार्श्वभूमीवर घडतो. या चित्रपटात 21 वर्षीय जुन्यांग आणि त्याचे वडील बून किआट यांचा प्रवास दाखवला आहे. नवीन नातेसंबंध आणि अनपेक्षित जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे आयुष्य कसे बदलते, हे यात चित्रित केले आहे. चार व्यक्ती एकाच घरात एकत्र राहू लागतात, तेव्हा कौटुंबिक नातेसंबंध, प्रौढावस्थेतील अनिश्चितता आणि सुरुवातीला एकमेकांना समजून घेण्यासाठी संघर्ष करणाऱ्या माणसांमध्ये हळूहळू निर्माण होणारे बंध याचा वेध ही कथा घेते.

'ग्रोइंग अप' या चित्रपट मालिकेसोबतच्या आपल्या प्रवासाविषयी कोह यांनी सांगितले. या चित्रपटांसोबतच एक अभिनेता म्हणूनही आपली जडणघडण झाली, असे ते म्हणाले. सुमारे 8,000 मुलांमधून आपली निवड झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. चेन यांच्यासोबत काम सुरू केले तेव्हा त्यांच्याकडे अभिनयाचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नव्हते असे ते म्हणाले. शालेय सुट्ट्यांमध्ये एक आनंददायी अनुभव म्हणून हा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर दिग्दर्शकासोबतच्या पुढील कामांमधून चित्रपट आणि अभिनयाशी तो अधिक दृढपणाने जोडला गेला, असे त्यांनी सांगितले.

आपल्या ‘जुनयांग’ या व्यक्तिरेखेविषयी बोलताना कोह म्हणाले की, कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्याची वेळ त्याच्यावर येते आणि त्याच वेळी समाजात आपले स्थान शोधण्याचाही तो प्रयत्न करत असतो. स्वतःच्या आयुष्यातील काही अनुभवही या चित्रपटात उतरल्याचे त्यांनी सांगितले. प्रौढत्वाकडे वाटचाल करताना येणारी आव्हाने, कठीण निर्णय घेण्याची वेळ आणि आयुष्याला योग्य दिशा शोधण्याचा संघर्ष, हे अनुभव जगभरातील तरुण प्रेक्षकांना आपलेसे वाटू शकतात, असेही कोह यांनी नमूद केले.

‘लिडिया’ची भूमिका साकारणाऱ्या लिम यांनी चित्रपटाच्या शीर्षकाचे महत्त्व स्पष्ट केले. कथेत दाखवल्याप्रमाणे वडील आणि मुलासारखे रक्ताचे नाते असलेले लोकही एकमेकांसाठी अनोळखी राहू शकतात, चार व्यक्ती एकाच छताखाली राहू लागतात, तेव्हा हळूहळू त्या एकमेकांना समजून घेण्यास आणि स्वीकारण्यास शिकतात. यातून कुटुंब केवळ रक्ताच्या नात्याने तयार होत नाही, तर परस्परांना समजून घेणे, स्वीकारणे आणि भावनिक बंध निर्माण होणे यांतूनही कुटुंबाची वीण घट्ट होत जाते, हे अधोरेखित होते, असे त्यांनी सांगितले. 

नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये कम्युनिकेशन्सचे शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा अभिनयाकडे वळण्याच्या अनुभवाविषयीही लिम यांनी सांगितले. या शिक्षणामुळे अभिनयकलेविषयीची त्यांची आवड पुन्हा जागृत झाली. चित्रपट हे असे माध्यम आहे, ज्यातून प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्यापेक्षा वेगळे जीवन, देश आणि संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.

सिंगापूरची ओळख केवळ समृद्धी आणि संपन्नतेपुरती मर्यादित न राहता, तेथील सर्वसामान्य लोकांचे दैनंदिन जीवनही या चित्रपटाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा कोह यांनी व्यक्त केली. कुटुंब, जबाबदारी आणि मोठे होताना निर्माण होणाऱ्या अनिश्चिततेचे हळुवार चित्रण करणारा ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ हा चित्रपट इफ्फी 2026 च्या ‘सीमांच्या पलीकडच्या कथा’ (Stories Without Borders) या संकल्पनेला साजेसा समारोप ठरतो. आपलेपणा आणि मानवी नातेसंबंधांचा वेध घेत हा चित्रपट भावना आणि अनुभवांच्या माध्यमातून विविध संस्कृती आणि भौगोलिक सीमा ओलांडून माणसे एकमेकांशी कशी जोडली जातात, हे अधोरेखित करतो.

या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन किरण मुरली यांनी केले.

संपूर्ण पत्रकार परिषद:

Read IFFILOID here: https://www.pib.gov.in/iffi/57/iffiLoid.aspx?yr=2026&lang=1&reg=48

 

* * *

पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/राधिका अघोर/राज दळेकर/वैभवी जोशी/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2026 and #StoriesWithoutBorders. Tag us @pibindia on Instagram and @PIB_India on X, and we will help amplify your festival moments!

For accredited journalists, critics, bloggers, and vloggers seeking 1-on-1 interviews with filmmakers and festival juries, write to us at:
iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Official Release ID: 2343141
•
Media Centre: Goa
•
Festival Dates: Nov 20 – 28, 2026