संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कामठी येथील एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमीतून 396 केअर टेकर अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण केले पूर्ण


संरक्षण सचिवांनी कामठी येथील एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमीच्या दीक्षांत संचलनाचे केले अवलोकन

Posted On: 28 NOV 2026 7:14PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) वरिष्ठ विभागाच्या एकूण 396 केअर टेकर अधिकाऱ्यांनी (सीटीओ) 28 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्रातील कामठी येथील एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमीतून आपले 90 दिवसांचे कठोर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. हा भव्य दीक्षांत संचलन सोहळा चुन्नी लाल परेड मैदानावर पार पडला. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह (आयएएस) यांनी दीक्षांत पथसंचलनाचे अवलोकन केले.

या संचलनामध्ये देशभरातील 19 एनसीसी संचालनालयांमधील 368 लष्करी केअर टेकर अधिकारी आणि 28 नौदल केअर टेकर अधिकारी सहभागी झाले होते. बंगळुरू केंद्राच्या मद्रास इंजिनिअर ग्रुपच्या मिलिटरी बँडने वाजवलेल्या स्फूर्तिदायी लष्करी धुनांच्या तालावर विविध तुकड्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. संपूर्ण भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संचलनातून, एनसीसीचे 'एकता आणि शिस्त' हे ब्रीदवाक्य प्रतिबिंबित झाले. या संचलनाचे नेतृत्व अकादमी अंडर ऑफिसर थोटा प्रशांत यांनी केले.

अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, केअर टेकर अधिकाऱ्यांना असोसिएट एनसीसी ऑफिसर (एएनओ) म्हणून एनसीसीमध्ये पद देण्यात आले. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून 'एनसीसी प्रशिक्षक आणि व्यक्तिमत्व विकास' या विषयातील पदविका देखील प्रदान करण्यात आली.

केअर टेकर अधिकारी आदित्य भूषण यांनी गुणवत्ता यादीत प्रथम स्थान पटकावले. त्यांना कमांडंट सुवर्णपदक आणि महासंचालक बॅटन देऊन गौरवण्यात आले. केअर टेकर अधिकारी अमितकुमार सिंह यांनी रौप्य, तर केअर टेकर अधिकारी राजेश्वरन आर यांनी कांस्यपदक पटकावले. आंतर कंपनी अजिंक्यपदासाठीचा कमांडंट ध्वज अर्जुन कंपनीने जिंकला.

90 दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात कवायत, शारीरिक प्रशिक्षण, गोळीबार आणि जमिनीवरील युद्धकौशल्यासह लष्करी प्रशिक्षण, नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व विकास, सामुदायिक विकास तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा अंतर्भाव होता. आपल्या संबंधित तुकड्यांमधील राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रांना उत्तमरित्या प्रशिक्षीत करता यावे यादृष्टीने काळजीवाहू अधिकाऱ्यांना आवश्यक कौशल्ये, ज्ञान आणि नेतृत्व गुणांनी सज्ज करणे हा या सर्वसमावेशक प्रशिक्षणाचा उद्देश होता.

संरक्षण सचिव आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी राजेश कुमार सिंह यांनी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या तुकडीला संबोधित केले. नव्याने नियुक्त झालेल्या सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेची उद्दिष्टे आणि ध्येयांची जपणूक करावी असे आवाहन त्यांनी केले. युवा प्रतिभेची जडणघडण करत तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रांना जबाबदार, शिस्तबद्ध आणि बहुगूणसंपन्न नागरिक बनवून राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. संचलनादरम्यान सादर केलेल्या उच्च दर्जाच्या कवायतीबद्दल त्यांनी या तुकडीचे कौतुक केले तसेच हे प्रशिक्षण उत्कृष्टरित्या पार पाडल्याबद्दल अधिकारी प्रशिक्षण अकादमीच्या (OTA - Officers Training Academy) चमूचीही त्यांनी प्रशंसा केली.

राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स [युद्ध सेवा पदक (YSM - Yuddh Seva Medal), सेना पदक (SM - Sena Medal), विशिष्ट सेवा पदक (VSM - Vishisht Seva Medal)] हे देखील PRCN/SD-175 Course (महाविद्यालयीन एनसीसी तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापकांचा 175 वा कमिशनपूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम) या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलनाला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

या सोहळ्याला वरिष्ठ अधिकारी, मान्यवर आणि प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या सोहळ्यासोबतच या प्रशिक्षणाची यशस्वी सांगता झाली आणि राष्ट्र उभारणी तसेच युवा विकासासाठी समर्पित सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी म्हणून त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली.

***

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/तुषार पवार/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2343259) अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein: English