• Skip to Content
  • Sitemap
  • Advance Search
शिक्षण मंत्रालय

‘स्वयम’ शैक्षणिक सत्राच्या माध्यमातून जुलै 2020 मध्ये अभियांत्रिकीचे विषय वगळता 82 पदवी आणि 42 पदव्युत्तर ऑनलाईन अभ्यासक्रम - रमेश पोखरियाल ‘निशंक’


विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विद्यमान नियमानुसार या ऑनलाईन अभ्यासक्रमाची पूर्तता करून विद्यार्थी ‘पतगुणांकन’ घेवू शकणार - मनुष्यबळ विकास मंत्री

प्रविष्टि तिथि: 21 MAY 2020 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21  मे 2020

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाशी  संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्‍यांना यूजीसीच्या ‘स्वयम’ या ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेवून शिकता येईल आणि ‘पतगुणांकन’ मिळवता येईल, असं सांगितलं.

विद्यापीठ अनुदान आयोगाने आपल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंना आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पदवी अभ्यासक्रमाची आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सूची सामायिक केली आहे. या अभ्यासक्रमामध्ये अभियांत्रिकीचे विषय, शिक्षण यांचा समावेश नाही, असही पोखरियाल यांनी स्पष्ट केलं. जुलै 2020 च्या शैक्षणिक सत्रापासून मोठ्या प्रमाणावर मुक्तपणाने सर्वांना ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करता यावा, यासाठी ‘स्वयम’ने पूर्ण तयारी केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत ( www.swayam.gov.in ) या संकेतस्थळावर ऑनलाईन अभ्यासक्रम शिकवण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.

स्वयमच्या माध्यमातून बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजिकल सायन्स आणि बायोइंजिनीअरिंग, शिक्षणशास्त्र, विधी, कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीअरिंग, वाणिज्य, व्यवस्थापन, औषधशास्त्र, गणित, इतिहास, हिंदी, संस्कृत इत्यादी विषयांचा अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे, असं पोखरियाल यांनी यावेळी सांगितलं.

कोविड-19 महामारीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये विविध अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे. त्याचा लाभ विद्यार्थी, शिक्षक, त्याचबरोबर सातत्याने नवं काही शिकण्याची ज्यांना इच्छा असते असे लोक, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी यांनाही आपले नाव नोंदवून स्वयम अभ्यासक्रम पूर्ण करता येईल. आपल्या शैक्षणिक कक्षा रुंदावण्यासाठी ही सोय सर्वांना देण्यात आली आहे, असंही केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी यावेळी सांगितलं.

स्वयम (स्टडी वेब्ज ऑफ ऍक्टिव्ह-लर्निंग फॉर यंग अस्पारिंग माईंड) हा कार्यक्रम भारत सरकारने सुरू केला आहे. या माध्यमातून सर्वांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी, तसेच त्यामध्ये समानता असावी आणि दिले जाणारे शिक्षण गुणवत्तापूर्ण असावे, या तीन मूलभूत तत्वांचा विचार करून स्वयम अभ्यासक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

 

B.Gokhale/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1625879) Visitor Counter : 246
Link mygov.in
National Portal Of India
STQC Certificate