जलशक्ती मंत्रालय
भारतातील जलमापन माहितीसाठ्याच्या विश्वासार्हतेला बळकटी देण्यासाठी केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्राच्या वतीने प्रीसीसेन्स-2026 या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
वास्तव वेळेतील जलमापन माहितीसाठा : आधुनिक प्रशासनाचा कणा
प्रविष्टि तिथि:
22 JAN 2026 8:29PM by PIB Mumbai
पुणे, 22 जानेवारी 2026
खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्रात (CWPRS) आजपासून प्रीसीसेन्स2026 - अचूक संवेदकांद्वारे विश्वासार्ह जलमापन माहितीसाठा (PreciSense-2026 – Reliable Hydrometric Data through Precise Sensing) या अभिनव राष्ट्रीय कार्यशाळेला सुरुवात झआली. जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे सचिव व्ही. एल. कांता राव (IAS) यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले.

ही कार्यशाळा भारतातील तंत्रज्ञान आधारित जल प्रशासनाच्या दिशेने एक परिवर्तनकारी पाऊल ठरली आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त गजेंद्र बावणे आणि महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे हे मान्यवर सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुण्यातील नदी काठ सुधार प्रकल्पाचा संदर्भ त्यांनी दिला. शहरी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या वैधतेच्या बाबतीत केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्रासारख्या संस्थांची महत्त्वाच्या भूमिका त्यांनी अधोरेखित केली. जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी वैज्ञानिक वैधता महत्त्वाची असते ही बाबही त्यांनी नमूद केली.

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. जलसंपदा व्यवस्थापनात अचूक मोजमाप अत्यंत गरजेचे असते असे त्यांनी सांगितले. वास्तव वेळेतील माहितीसाठ्याचे संकलन हा आधुनिक प्रशासनाचा कणा असल्याचे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञान आता अधिक विकसित आणि किफायतशीर झाले असून, यामुळे पूर व्यवस्थापन आणि प्रकल्प अंमलबजावणीच्या प्रक्रियेत योग्य निर्णय घेणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
व्ही. एल. कांता राव यांनी या कार्यशाळेत बीजभाषण दिले. जलालेख शास्त्र आणि जलमापन माहितीसाठा हे पाण्यासंदर्भातले आंतरराज्यीय विवाद सोडवण्यासाठी तसेच दीर्घकालीन नियोजनासाठीचे मूलभूत घटक आहेत असे ते म्हणाले.
या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रादरम्यान केंद्रीय सचिवांच्या उपस्थितीत तीन ऐतिहासिक सामंजस्य करारही झाले.

केंद्रीय जल आणि उर्जा संशोधन केंद्राच्या सहसंचालक डॉ. रेश्मी के. व्ही. यांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली. या धोरणात्मक करारांचे त्यांनी स्वागत केले. या करारांमुळे संस्थात्मक समन्वयाचे एक नवे पर्व सुरू होईल, यामुळे देशभरातील जलमानपनातील अचूकता, विश्वासार्हता आणि मानकीकरणात क्रांती घडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

* * *
पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217441)
आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English