महिला आणि बालविकास मंत्रालय
रेल्वे स्थानकांवर BIG FM लाइव्ह स्टुडिओ संवाद आयोजित करून पश्चिम रेल्वेने साजरा केला आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026
Posted On:
09 MAR 2026 6:57PM by PIB Mumbai
मुंबई, 9 मार्च 2026
पश्चिम रेल्वेने रविवार, 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 निमित्त लोकप्रिय रेडिओ चॅनेल BIG FM यांच्या सहकार्याने एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाद्वारे रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांच्या प्रेरणादायी कथा थेट श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या.यासाठी प्रमुख रेल्वे स्थानकांवर लाईव्ह स्टुडिओ संवादाचे आयोजन करण्यात आले होते.
महिला दिनाच्या उत्सवाचा भाग म्हणून BIG FM द्वारे रविवार, 8 मार्च 2026 रोजी चर्चगेट रेल्वे स्थानक, वडोदरा रेल्वे स्थानक आणि इंदूर रेल्वे स्थानकावर एकाच वेळी एक विशेष "लाइव्ह स्टुडिओ शिफ्ट" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या लाईव्ह प्रक्षेपण सत्रांदरम्यान, BIG FM मधील रेडिओ जॉकींनी पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांमधील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. चर्चगेट स्थानकावर, आर जे राणी यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. त्यांनी पश्चिम रेल्वेच्या सुमारे तीस महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांचा व्यावसायिक प्रवास, अनुभव आणि कामगिरीबाबत चर्चा केली. त्याचप्रमाणे, वडोदरा स्थानकावरील सत्र आर.जे मेघा यांनी केले, तर इंदूर स्थानकावरील संवाद सत्र आर.जे पिहू यांनी घेतले.
या चित्ताकर्षक चर्चेत महिला रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे संचलनातील त्यांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांबद्दल माहिती दिली. रेल्वे क्षेत्रात करिअर निवडण्यामागील प्रेरणा आणि त्यांच्या व्यावसायिक प्रवासादरम्यान आलेल्या आव्हानांबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने अनुभव सांगितले. दृढनिश्चय, चिकाटी आणि समर्पण याच्या बळावर अडचणींवर मात करून रेल्वे व्यवस्थेच्या सुरक्षित आणि कार्यक्षम संचलनात आपले योगदान कसे देत आहोत याविषयीही त्यांनी माहिती दिली.
या संवादात रेल्वेमध्ये तांत्रिक आणि कार्यकारी भूमिकांमध्ये महिलांचा वाढता सहभाग देखील अधोरेखित झाला. यामुळे संस्थेमध्ये घडत असलेल्या सकारात्मक आणि प्रगत बदलांचे प्रतिबिंब दिसून आले. कर्मचाऱ्यांनी अशा कार्यबलाचा भाग असल्याचा अभिमान व्यक्त केला जिथे महिला सातत्याने महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या स्वीकारत आहेत.

कार्यक्रमादरम्यान, सहभागी महिलांनी तरुण मुलींना प्रेरणादायी संदेश देखील देत त्यांना अभियांत्रिकी, तांत्रिक क्षेत्रे तसेच रेल्वे क्षेत्रात आत्मविश्वास आणि दृढनिश्चयाने करिअर करण्यासाठी प्रोत्साहित केले.
पश्चिम रेल्वे विविध विभागांमध्ये महिलांना संधी उपलब्ध करून देऊन लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि महिला कर्मचाऱ्यांना सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहे. अशा प्रकारचे उपक्रम केवळ रेल्वे विभागातील महिलांच्या मौल्यवान योगदानाची दखल घेत नाहीत तर पुढच्या पिढीला अडथळे दूर करून त्यांच्या आकांक्षा साध्य करण्यासाठी प्रेरणा देतात.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2237161)
अभ्यागत कक्ष : 10