अणुऊर्जा विभाग
आरोग्य सेवा आणि संशोधनातील अणुशास्त्राची भूमिका जाणून घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी विकिरण आणि समस्थानिक तंत्रज्ञान मंडळ आणि कर्करोग प्रगत उपचार, संशोधन आणि शिक्षण केंद्राला दिली भेट
या भेटीतून माध्यम प्रतिनिधींनी जाणून घेतली अणुवैद्यक, विकिरण तंत्रज्ञान आणि कर्करोग संशोधनाबाबतची ज्ञानवर्धक माहिती
Posted On:
09 MAR 2026 8:03PM by PIB Mumbai
मुंबई, 9 मार्च 2026
अणुशक्ती विभागाच्या सार्वजनिक जागरूकता आणि माध्यम संवाद विभागाने पत्र सूचना कार्यालय अधिस्वीकृत मुंबईतील पत्रकारांसाठी अणुशक्ती विभागाच्या अखत्यारितल्या दोन महत्त्वाच्या संस्थांच्या भेटीचे आयोजन केले होते. याअंतर्गत विकिरण आणि समस्थानिक तंत्रज्ञान मंडळ (BRIT - Board of Radiation and Isotope Technology) आणि कर्करोग प्रगत उपचार, संशोधन आणि शिक्षण केंद्र (ACTREC) या संस्थांना भेटीचा समावेश होता. 5 मार्च 2026 रोजी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.याअंतर्गत या संस्थांना भेट दिलेल्या प्रतिनिधींमध्ये पत्रसूचना कार्यालयाच्या उपसंचालिका जयदेवी पुजारी स्वामी, पीए अॅन्ड एमआयडी विभागाचे प्रमुख डॅनियल बाबू पी. यांच्या नेतृत्वाखाली 19 पत्रकारांच्या पथकाचा सहभाग होता.
माध्यम प्रतिनिधींच्या या पथकात पत्र सूचना कार्यालय, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, द टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्थान टाइम्स, फ्री प्रेस जर्नल, पुढारी, आकाशवाणी, दूरदर्शन, लोकसत्ता, नवशक्ती, ट्रू हंट, प्रहार आणि द वीक या माध्यम संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश होता.

माध्यम क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञांमध्ये अणुशास्त्र आणि अणू तंत्रज्ञानाच्या सामाजिक उपयोगांबद्दल, विशेषतः आरोग्य सेवा, विकिरण तंत्रज्ञान, कर्करोगावरील उपचार आणि समस्थानिक (isotope) अॅप्लिकेशनच्या क्षेत्रांसंबंधीची जागरूकता वाढवणे हा या भेटीमागचा उद्देश होता. या उपक्रमामुळे पत्रकारांना अणुशक्ती विभागाच्या वतीने अणुशास्त्राचा सामाजिक लाभासाठी उपयोग करून घेण्यासाठी केल्या जात असलेल्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. यासोबतच विकिरण आणि समस्थानिक तंत्रज्ञान मंडळाने किरणोत्सारी समस्थानिके (Radioisotopes), विकिरण प्रक्रिया आणि वैद्यकीय अॅप्लिकेशनच्या क्षेत्रात केलेले काम माध्यमांसमोर मांडणे, कर्करोगावरील प्रगत उपचार, संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रातील प्रगत कर्करोग उपचार केंद्राची भूमिका अधोरेखित करणे आणि अणुशक्ती विभागाच्या घडामोडींबद्दल सामान्य नागरिकांमधील माहितीसंपन्नतेच्या बाबतीत सुधारणा घडवून आणण्यासाठी शास्त्रज्ञ आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये अर्थपूर्ण संवादाचा मार्ग प्रशस्त करणे हे देखील या भेटीमागचे उद्दिष्ट होते.
विकिरण आणि समस्थानिक तंत्रज्ञान मंडळाला दिलेल्या भेटीत संस्थेचे मुख्य कार्यकारी प्रदीप मुखर्जी यांनी पत्रकारांना संस्थेची उद्दिष्टे आणि उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली.
यावेळी संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि शास्त्रज्ञांनी खाली नमूद क्षेत्रांबद्दल माध्यमांना माहिती दिली:
- वैद्यकीय किरणोत्सारी समस्थानिकांचे उत्पादन आणि पुरवठा
- आरोग्य सेवा, उद्योग आणि कृषी क्षेत्राअंतर्गत वापरले जाणारे विकिरण तंत्रज्ञान
- वैद्यकीय उत्पादनांचे विकिरण निर्जंतुकीकरण
- खाद्यान्न विकिरण प्रक्रिया तसेच आणि औद्योगिक रेडियोग्राफी यांसारखी ॲप्लिकेशन्स
यावेळी या माध्यम पथकाला किरणोत्सारी समस्थानिक उत्पादन, औद्योगिक आणि आरोग्य सेवा विषयक ॲप्लिकेशन्स , गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था, सुरक्षा विषयक नियमावली, खाद्यान्न विकिरण प्रक्रिया प्रकल्प तसेच विकिरण तंत्रज्ञानाचे व्यापक सामाजिक फायदे समजून घेता येतील अशी निवडक सुविधा केंद्र आणि प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी शास्त्रज्ञांशी संवादही साधला, त्यांनी शास्त्रज्ञांकडून भारतातील अणुवैद्यक तसेच समस्थानिक आधारित निदानाबद्दलच्या वाढत्या मागणीविषयी आपल्या शंकांचे निरसनही करून घेतले.

माध्यम प्रतिनिधी मंडळाने त्यानंतर कर्करोग प्रगत उपचार संशोधन आणि शिक्षण केंद्र, टाटा मेमोरियल सेंटरच्या संशोधन आणि शैक्षणिक विभागाला भेट दिली. डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी प्रतिनिधीमंडळाचे स्वागत केले आणि प्रास्ताविक भाषण केले. त्यानंतर पत्रकारांसाठी या केंद्राच्या प्रमुख कार्यक्षेत्रांवर सादरीकरणे देण्यात आली.

पत्रकारांना निवडक संशोधन आणि क्लिनिकल सुविधा दाखवण्यात आल्या. त्यांना SPECT/CT आणि PET/CT इमेजिंग सिस्टम आणि प्रोटॉन थेरपी सेंटर सारख्या प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. संवादात्मक सत्रांदरम्यान, शास्त्रज्ञांनी अणुऊर्जा विभागाच्या सहाय्याने विकसित तंत्रज्ञान आरोग्य सेवेत कसे महत्त्वपूर्ण योगदान देत आहे याविषयी माहिती दिली. विशेषतः अणुवैद्यक निदान, कर्करोग उपचार, वैद्यकीय साहित्याचे किरणोत्सर्गाद्वारे निर्जंतुकीकरण तसेच सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आरोग्य तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये या तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
या संवादामुळे पत्रकारांना अणुविज्ञान संशोधन आणि त्याच्या वास्तविक-जगातील समाजावर होणारा प्रत्यक्ष परिणाम यातील संबंध अधिक सखोलपणे समजून घेण्याची संधी मिळाली. या भेटीला पत्रकारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. प्रगत वैज्ञानिक सुविधांशी थेट संपर्क साधण्याची, आघाडीच्या संशोधकांशी आणि चिकित्सकांशी संवाद साधण्याची आणि आरोग्यसेवा परिणाम सुधारण्यात अणुविज्ञानाची भूमिका समजून घेण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

अशा उपक्रमांमुळे विज्ञानविषयक संवाद अधिक बळकट होण्यास तसेच अणुऊर्जा विभागाच्या संस्थांच्या योगदानाबाबत जनजागृती वाढवण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
निलीमा चितळे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2237202)
अभ्यागत कक्ष : 14