नौवहन मंत्रालय
मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींमुळे उद्भवणाऱ्या व्यापारातील अडथळ्यांना तोंड देण्यासाठी जेएनपीएने केली कृती दलाची स्थापना
Posted On:
09 MAR 2026 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2026
मध्य पूर्वेतील बदलती भू-राजकीय परिस्थिती तसेच जागतिक नौवहन आणि व्यापार लॉजिस्टिक्सवरील त्याचा परिणाम लक्षात घेत सागरी व्यापारातील अडथळे कमी करण्याच्या दृष्टीने बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने (एमओपीएसडब्ल्यू) सर्व प्रमुख बंदरांसाठी एक मानक कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली आहे.
या कार्यप्रणालीचे पालन करून जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) प्रतिसादात्मक उपाययोजनांचा समन्वय साधण्यासाठी आणि व्यापार सुलभीकरणासाठी एक समर्पित कृती दल स्थापन केले आहे.
मध्य पूर्वेतील सध्याच्या भू-राजकीय घडामोडींमुळे उद्भवणाऱ्या व्यापारातील अडथळ्यांशी संबंधित सर्व समन्वय आणि संवादासाठी जेएनपीएचे मुख्य महाव्यवस्थापक (वाहतूक) गिरीश थॉमस यांना एकल संपर्क बिंदू (एसपीओसी) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
मध्य पूर्वेतील सध्याच्या भू-राजकीय घडामोडींमुळे उद्भवणाऱ्या व्यत्ययामुळे जहाजांच्या वेळापत्रकांवर आणि मध्य पूर्वेकडील निर्यात मालवाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे बंदर अधिकारी आणि व्यापारी भागधारकांमध्ये समन्वयित प्रयत्न सुरू झाले आहेत. गौरव दयाल, आयएएस, अध्यक्ष, जेएनपीए आणि रवीश कुमार सिंग, आयआरटीएस, उपाध्यक्ष, जेएनपीए हे परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी आणि कार्यान्वयन चिंता दूर करण्यासाठी नौवहन कंपन्या, निर्यातदार, टर्मिनल ऑपरेटर, सीमाशुल्क अधिकारी, सागरी नियामक आणि बीसीबीए, अपेडा, सीएसएलए, मानसा, एफएफएफएआय आणि वाहतूकदार संघटना इत्यादी व्यापार संघटनांशी नियमित सल्लामसलत करत आहेत.
एक्झिम समुदायाला पाठिंबा देण्यासाठी आणि बंदरातील गर्दी कमी करण्यासाठी जेएनपीएने अनेक सुविधा उपाययोजना राबवल्या आहेत:
- मध्य पूर्वेकडे जाणाऱ्या मालवाहतुकीसाठी तात्पुरत्या ट्रान्सशिपमेंट साठवण सुविधेची तरतूद
- आवश्यक असेल तेथे टर्मिनल्सवर अतिरिक्त साठवण क्षेत्रांचे वाटप
- होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील मध्य पूर्व बंदरांवर मालवाहतूक करण्यासाठी तात्पुरत्या जहाजांच्या कॉलची सुविधा, ज्यामध्ये युएईमधील फुजैराह आणि खोर फक्कन आणि ओमानमधील सोहर, मस्कत आणि सलालाह यांचा समावेश आहे.
- मध्य पूर्वेतून परत येणाऱ्या नाशवंत माल आणि निर्यात मालाची प्राधान्याने हाताळणी
- निर्यात कंटेनरसाठी जलद 'बॅक टू टाउन' (बीटीटी)
जवाहरलाल नेहरू कस्टम्स हाऊस (जेएनसीएच) येथे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एक महत्त्वाची सुविधा देखील उपलब्ध केली आहे.
रीफर ट्रान्सपोर्टर्स असोसिएशनशी सल्लामसलत केल्यानंतर रीफर आणि बीटीटी इव्हॅक्युएशनची आवश्यकता असलेल्या इतर कंटेनरच्या वाहतुकीसाठी पुरेसे ट्रेलर उपलब्ध असल्याची पुष्टी झाली आहे. यामुळे बंदरातून कंटेनरचे सुलभ स्थलांतर लॉजिस्टिक अडचणींशिवाय होईल, विशेषतः केळी, द्राक्षे आणि मर्यादित शेल्फ लाइफ असलेल्या इतर वस्तूंसाठी.
परिस्थितीबद्दल बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष गौरव दयाल, आयएएस म्हणाले,"जेएनपीए बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि एक्झिम समुदायाला पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. कार्गो वाहतूक सुलभ करण्यासाठी तसेच व्यत्यय कमी करण्याच्या दृष्टीने उपायांचा शोध घेण्यासाठी आम्ही मंत्रालय, सीमाशुल्क अधिकारी, टर्मिनल ऑपरेटर आणि व्यापार भागधारकांशी सतत सल्लामसलत करत आहोत. निर्यातदारांना आधार देणारे व्यावहारिक उपाय शोधणे आणि बंदरातील सुरळीत कामकाज सुनिश्चित करणे हा आमचा प्रयत्न आहे.”
या समन्वित प्रयत्नांमुळे बंदरातील परिस्थितीत सुधारणा दिसून येत आहे.जेएनपीएमध्ये अडकलेल्या कंटेनरची संख्या 1 मार्च रोजी सुमारे 5,000 टीईयू होती, ती 8 मार्च रोजी सुमारे 3,200 टीईयू झाली आहे तर अडकलेल्या नाशवंत कंटेनरची संख्या सुमारे 2,000 वरून सुमारे 1,000 पर्यंत कमी झाली आहे.
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2237244)
अभ्यागत कक्ष : 14