गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नशामुक्त भारत 2029 बाबत जनजागृती करण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाच्या वतीने अमली पदार्थ नियंत्रण संस्था आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहकार्याने ठाण्यात वार्तालाप उपक्रमाचे आयोजन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठी आखला मार्गदर्शक आराखडा

या मार्गदर्शक आराखड्याअंतर्गत आगामी 3 वर्षांसाठीची निर्धारीत उद्दिष्टे, कालमर्यादा, नियमित देखरेख, मूल्यमापन करता येण्याजोगे परिणाम आणि कृती आराखड्याचा अंतर्भाव

युवापिढीमधील अमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध करणे तसेच उपचार आणि पुनर्वसन क्षमतेचा 5 पटींपेक्षा जास्त विस्तार करण्याचे उद्दिष्ट व्हिजन डॉक्युमेंट अंतर्गत निश्चित

Posted On: 30 SEP 2026 4:19PM by PIB Mumbai

 

मुंबई, 29 सप्‍टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 2029 पर्यंत नशामुक्त भारत घडवण्यासाठी एक मार्गदर्शक आराखडा तयार केला आहे. 26 जून 2026 रोजी नवी दिल्ली इथे पार पडलेल्या राष्ट्रीय अमली पदार्थ समन्वय केंद्राच्या 10व्या सर्वोच्च स्तरीय बैठकीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘व्हिजन डॉक्युमेंट 2026-2029 या नशामुक्त भारतासाठीच्या मार्गदर्शक आराखडा प्रकाशित केला होता. या आराखड्याबाबत जनजागृती करण्यासाठी पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाच्या वतीने, अमली पदार्थ नियंत्रण संस्था (एनसीबी) आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सहकार्याने मंगळवारी, 29 सप्टेंबर 2026 रोजी ठाणे येथे वार्तालाप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पत्र सूचना कार्यालयाच्या मुंबई विभागाच्या महासंचालिका स्मिता वत्स शर्मा, केंद्रीय गृह मंत्रालयाचे अप्पर महासंचालक (माध्यम) राज कुमार आणि अमली पदार्थ नियंत्रण संस्थेच्या मुंबई विभागाचे उपमहासंचालक विशाल सानप यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी नशामुक्त भारत 2029 साठीची उद्दिष्टे, रणनीती, कृती आराखडा आणि कालमर्यादा याविषयी सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती विशाल सानप यांनी दिली.

26 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय अमली पदार्थ समन्वय केंद्राच्या (NCORD) 10व्या सर्वोच्च स्तरीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्हिजन डॉक्युमेंट 2026-29 प्रकाशित केले. पुढील तीन वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या या कृती आराखड्यात निश्चित उद्दिष्टे, कालमर्यादा, नियमित देखरेख, परिणामांचे मूल्यमापन आणि 200 हून अधिक कृती बिंदू समाविष्ट आहेत. 35 हून अधिक मंत्रालये, विभाग आणि संस्थांशी सल्लामसलत करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

जुलै 2026 ते जुलै 2029 या कालावधीतील कृती आराखडा गुप्तवार्ता व कारवाई आधारित अंमलबजावणी, पूर्वघटक व कृत्रिम अमली पदार्थांवर नियंत्रण, मागणी व हानी कमी करणे आणि क्षमता बांधणी व समन्वय या चार प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. ‘शोधा, विस्कळीत करा आणि नष्ट करा’ या कार्यान्वयन मंत्राद्वारे अमली पदार्थांचे स्रोत, तस्करीचे मार्ग, वित्तपुरवठा आणि गुन्हेगारी जाळ्यांवर कारवाई करण्यावर भर देण्यात आला आहे.

2019 ते जुलै 2026 या कालावधीत अंदाजे 1.53 लाख कोटी रुपये किमतीचे 93.33 लाख किलो अमली व सायकोट्रॉपिक पदार्थ जप्त करण्यात आले असून, त्यापैकी 88,010 कोटी रुपये किमतीचे 44,88,576 लाख किलो पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत. याच काळात 3,992 कोटींची बेकायदेशीर मालमत्ता गोठवण्यात किंवा जप्त करण्यात आली आणि 128 बेकायदेशीर गुप्त प्रयोगशाळा बंद करण्यात आल्या.

युवांमधील अमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध करण्याबरोबरच उपचार व पुनर्वसन क्षमता पाच पटीहून अधिक वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सध्याची 334 व्यसनमुक्ती केंद्रांची संख्या मार्च 2029 पर्यंत 1,751 करण्यात येणार आहेत. मुले आणि महिलांसाठी विशेष सुविधा तसेच प्रत्येक राज्यातील एका वैद्यकीय महाविद्यालयात समर्पित विभाग देखील स्थापन करण्यात येणार आहेत.

हे अभियान लोकचळवळ म्हणून गती धरेल. सध्याच्या 20 कोटी लोकांवरून 50 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून एनसीसी, एनएसएस आणि माय भारतच्या माध्यमातून एक लाख 'नशामुक्त भारत मित्र' तयार केले जातील. अमली पदार्थ व्यसनविरोधी लढ्यात शाळा आणि महाविद्यालये संरक्षणाची पहिली फळी होतील. शैक्षणिक संस्था, अमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार शिक्षण मंत्रालय, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्यासह शैक्षणिक संस्थांनी केला आहे.

वार्तालाप उपक्रमाच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना या राष्ट्रीय अभियानाच्या उद्दिष्टांची माहिती देत लोकसहभाग आणि जनजागृतीला चालना देण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात आला.

***

Nitin Fulluke/Parshuram Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2317015) अभ्यागत कक्ष : 38