संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत आयोजित भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर परिषद 2026 चे दुसरे पर्व


संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नौदलाच्या कमांडर्सना केले संबोधित, भारतीय नौदलाची वाढती सामरिक भूमिका आणि वाढता विस्तार केला अधोरेखित.

धोरणात्मक क्षमता वाढवणारे दल म्हणून भारतीय नौदलाच्या वाढत्या सामरिक शक्तीचे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांनी केले कौतुक. त्यांनी आधुनिक युद्धशास्त्रात तंत्रज्ञानाचे परिवर्तन, डेटा म्हणजे माहिती सामायिक करणे आणि प्रतिसाद देण्याची क्षमता यावर दिला भर

Posted On: 30 SEP 2026 12:14PM by PIB Mumbai

भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर परिषद 2026 च्या दुसऱ्या पर्वाला 29 सप्टेंबर 2026 रोजी नवी दिल्लीत नौसेना भवन इथे सुरुवात झाली. या परिषदेच्या निमित्ताने भारतीय नौदलातील ऑपरेशनल आणि क्षेत्रीय कमांडर्स पदावरील ज्येष्ठ अधिकारी एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि त्यांनी नौदलाची  कार्यात्मक सज्जता, सागरी सुरक्षा आणि भविष्यातील क्षमता विकास यावर विस्तृत विचारविनिमय केला.

नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांच्या उदघाटनपर भाषणाने या परिषदेची सुरुवात झाली. त्यांनी आपल्या भाषणात सध्याच्या बदलत्या  सागरी  सुरक्षेच्या स्थितीचा आणि भारतीय नौदलाच्या सज्जतेचा सविस्तर आढावा घेतला. नौदलासाठी अतिशय उच्च दर्जाची युद्धसज्जता, चपळता आणि तत्पर प्रतिसाद क्षमता असणे आवश्यक असून सागरी क्षेत्रातील समकालीन आणि उदयोन्मुख आव्हानांचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाचा अंगीकार आणि  क्षमता विकास यांना देखील तितकेच महत्त्व आहे, असे ते म्हणाले.

नौदल कमांडर्सना संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सागरी क्षेत्रातील भारताची वाढती सामरिक जबाबदारी आणि हिंदी महासागर क्षेत्रात फर्स्ट रिस्पॉन्डर अर्थात आपत्कालीन परिस्थितीत सर्वात आधी प्रतिसाद देणारा देश आणि पसंतीचा सुरक्षा भागीदार म्हणून भारतीय नौदलाच्या भूमिकेवर विशेष भर दिला. त्यांनी सागरी देखरेख, विश्लेषणात्मक क्षमता आणि कार्यात्मक तत्परता बळकट करण्याच्या गरजेवर भर दिला. 

पश्चिम आशियातील परिस्थितीचा संदर्भ देत, त्यांनी नौदलाच्या 'ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा' मोहिमेचा उल्लेख केला, आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या रक्षणासाठी, या मोहिमेचे योगदान त्यांनी अधोरेखित केले. ‘सुरक्षित समुद्र’ हे सुरक्षित राष्ट्र आणि विकसित राष्ट्राचा अविभाज्य भाग आहेत, असे नमूद करून, त्यांनी आत्मनिर्भरता, स्वदेशी क्षमता विकास आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या गरजेवर भर दिला.

संरक्षण दल प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी भारतीय नौदल, देशाची सामरिक शक्ती वाढवत असल्याचे नमूद केले, आणि तंत्रज्ञान आत्मसात करणे, आत्मनिर्भरता तसेच भारताची ऊर्जा सुरक्षा जपण्याच्या दिशेने भारतीय नौदलाने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची त्यांनी  प्रशंसा केली. त्यांनी युद्धाच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकला आणि तिन्ही सेना दलांमधील अधिक समन्वय आणि एकात्मतेच्या आधारावर, तंत्रज्ञानातील जलद परिवर्तन, डेटाची अखंड देवाणघेवाण तसेच वर्धित लवचिकता आणि सातत्यपूर्ण कार्यक्षमता, याच्या गरजेवर भर दिला.

लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनीही नौदल कमांडर्सशी संवाद साधला आणि समकालीन सुरक्षा विषयक वातावरणाबाबत आपला दृष्टिकोन मांडला. तिन्ही सेना दलांमधील परस्पर समन्वय आणि आंतर-कार्यान्वयन अधिक दृढ करण्यावर तसेच सुरक्षा विषयक उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकात्मिक प्रतिसाद अधिक बळकट करण्यावर या संवादात भर देण्यात आला.

तीन दिवसीय परिषदेच्या उर्वरित सत्रांमध्ये, नौदलातील वरिष्ठ अधिकारी  मोहिमा, सामग्री, लॉजिस्टिक्स, मनुष्यबळ, प्रशिक्षण, दल विकास आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा समावेश यावर सविस्तर चर्चा करतील. सैन्यदलाची पातळी वाढवणे, लढाऊ सज्जता बळकट करणे आणि क्षमता विकासाला गती देणे यासारख्या उपाययोजनांचाही यावेळी आढावा घेतला जाईल.

***

राधिका अघोर/भक्ती सोनटक्के/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2317158) अभ्यागत कक्ष : 12