संरक्षण मंत्रालय
भारतीय तटरक्षक दलाने सुमारे 3000 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले, आंतरराष्ट्रीय टोळीचा डाव उधळला
Posted On:
30 SEP 2026 1:27PM by PIB Mumbai
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातमधील दहशतवादविरोधी पथक यांनी संयुक्तपणे कारवाई करून 25 सप्टेंबर 2026 रोजी लक्षद्वीपच्या पश्चिमेस अरबी समुद्रात 3,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीची अमली पदार्थांची समुद्रमार्गे होणारी तस्करी करण्याचा एक मोठा प्रयत्न उधळून लावला.

या संयुक्त मोहिमेत सुमारे 526 किलो अति तीव्रतेचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले ज्यात, हेरॉइन आणि मेथॅम्फेटामाइन यासारख्या अंमली पदार्थांचा समावेश आहे. तस्करी होत असलेले जहाज चालवणाऱ्या पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले.
गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करत, भारतीय तटरक्षक दलाच्या (ICG) यंत्रणेने संशयित जहाजावर अचूक सागरी-हवाई पाळत ठेवली आणि त्याचा सतत मागोवा घेतला, आणि त्यानंतर संयुक्तपणे अत्यंत वेगाने त्याचा पाठलाग सुरू केला. अखेरीला, संशयास्पद इराणी ‘ढोव’ (डोलकाठी असलेली लाडकी नौका) प्रकारच्या नौकेला अडवण्यात येऊन त्यावर चढाई करण्यात आली.
त्यानंतर ही अडवलेली नौका, त्यावरील अटक करण्यात आलेले खलाशी आणि जप्त केलेला अवैध माल यांना संयुक्त चौकशी आणि पुढील तपासासाठी सशस्त्र सुरक्षेमध्ये मुंबईला आणण्यात आले. यानंतर तपास यंत्रणांनी संयुक्तपणे सखोल चौकशी करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
यशस्वीरित्या केलेली ही कारवाई ‘नशामुक्त भारत’ या राष्ट्रीय संकल्पनेत एक महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच सागरी मार्गाने होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीशी लढा देण्याप्रती भारताच्या सागरी क्षेत्रांमधील अवैध कारवायांप्रति शून्य सहनशीलतेचे धोरण राखण्याची भारतीय तटरक्षक दलाची वचनबद्धता अधोरेखित करते.

***
राधिका अघोर/सविता म्हसकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2317187)
अभ्यागत कक्ष : 19