दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
बीएसएनएल 1 ऑक्टोबर रोजी 27 वा स्थापना दिन साजरा करणार
Posted On:
30 SEP 2026 5:08PM by PIB Mumbai
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) एक ऑक्टोबर 2026 रोजी आपला 27 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. बीएसएनएल ची स्थापना 2000 मध्ये झाली होती. त्याला 26 वर्षे पूर्ण होत आहेत. गेली अनेक वर्षे बीएसएनएल देशभरात दूरसंचार सेवा प्रदान करत असून, या संस्थेने पारंपरिक लँडलाइन नेटवर्कपासून, ते मोबाइल, ब्रॉडबँड आणि इतर डिजिटल दळणवळण तंत्रज्ञानापर्यंत झालेला बदल अनुभवला आणि हाताळला आहे.
संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीचा आणि दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागांतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून, बीएसएनएल मोबाईल, भारत फायबर एफटीटीएच ब्रॉडबँड, फिक्स्ड-लाइन आणि एंटरप्राइझ सेवा पुरवते. ही संस्था ग्रामीण, दुर्गम आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रांमधील दूरसंचार पायाभूत सुविधांचा विस्तार, तसेच 'भारतनेट' (BharatNet) सारख्या राष्ट्रीय उपक्रमांच्या अंमलबजावणीशीही संबंधित राहिली आहे.
विदर्भ क्षेत्रात, बीएसएनएल नागपूर व्यवसाय क्षेत्राने आपल्या दूरसंचार पायाभूत सुविधांचा विस्तार आणि आधुनिकीकरण हाती घेतले आहे. यामध्ये ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारणे आणि 'भारत फायबर' या सेवांचा समावेश आहे. हे नेटवर्क बुटीबोरी आणि हिंगणा यांसारख्या औद्योगिक क्षेत्रासह, नागपूर आणि लगतच्या परिसराला, तसेच सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि इतर आस्थापनांनाही सेवा पुरवते.
स्थापना दिनानिमित्त बीएसएनएल नागपूर व्यवसाय क्षेत्राच्या प्रधान महाव्यवस्थापक नम्रता तिवारी यांनी संस्थेचे कर्मचारी आणि भागधारकांना शुभेच्छा दिल्या. 4G सेवांच्या अंमलबजावणीसह बीएसएनएलचा सध्या सुरू असलेला नेटवर्क विस्तार, हा वापरकर्त्यांच्या बदलत्या संपर्कविषयक गरजा पूर्ण करण्याच्या संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
***
राधिका अघोर/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2317209)
अभ्यागत कक्ष : 13