वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जी-20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे अमेरिकेत मिलवॉकी येथे आगमन
पीयूष गोयल यांनी एनएएम गोलमेज परिषदेत अमेरिकेतील वस्तुनिर्माण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुखांशी साधला संवाद
Posted On:
30 SEP 2026 5:11PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल जी-20 समूह देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेतील मिलवॉकी येथे पोहोचले आहेत. तिथे आगमन झाल्यावर शिकागो येथील भारताच्या दूतावासातील महावाणिज्य दूत डॉ. एम. आनंद प्रकाश यांनी त्यांचे स्वागत केले.
पीयूष गोयल यांनी नॅशनल असोसिएशन ऑफ मॅन्युफॅक्चरर्स - एनएएमद्वारे आयोजित व्यवसाय गोलमेज परिषदेत अमेरिकेतील प्रमुख वस्तुनिर्माण आणि तंत्रज्ञान कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. एनएएम संघटना अमेरिकेतील आघाडीच्या वस्तुनिर्माण कंपन्यांच्या मोठ्या भागाचे प्रतिनिधित्व करते. या कंपन्या अमेरिकेच्या सुमारे 3 ट्रिलियन डॉलर (तीन लाख कोटी डॉलर) जीडीपी अर्थात स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये मोलाचे योगदान देतात.
या संवादादरम्यान पीयूष गोयल यांनी अधोरेखित केले की, भारत-अमेरिका आर्थिक संबंध आता केवळ पारंपरिक व्यापारापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. हे संबंध दोन्ही देशांमधील गुंतवणूक, वस्तुनिर्माण, तंत्रज्ञान, नवोन्मेष, लवचिक पुरवठा साखळी आणि उच्च-मूल्य क्षमतांच्या निर्मितीपर्यंत विस्तारत आहेत.
उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारतात निर्माण होणाऱ्या संधींविषयी आपले विचार मांडले. तसेच भारतात आपला व्यवसाय विस्तारण्याबाबत कंपन्यांचे दृष्टिकोन त्यांनी स्पष्ट केले. यावर पीयूष गोयल यांनी, भारत सरकार या कंपन्यांना त्यांच्या भारतातील कामकाज, व्यवसाय विस्तार आणि गुंतवणुकीत मदत करण्यास पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले.
पीयूष गोयल, रॉकवेल ऑटोमेशनच्या जागतिक मुख्यालयात, व्यवसाय गोलमेज परिषद (बीआरटी- बिजनेस राऊंडटेबल) आणि एनएएमद्वारे आयोजित स्नेहमिलन समारंभालाही उपस्थित होते. यावेळी त्यांनी जी-20 मधील इतर देशांच्या व्यापार मंत्र्यांशी आणि अमेरिकी कंपन्यांच्या वरिष्ठ व्यवसाय प्रमुखांशी संवाद साधला.
***
सोनाली कुलकर्णी/आशुतोष सावे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2317244)
अभ्यागत कक्ष : 11