संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री चौथ्या भारत-जपान 2+2 मंत्रीस्तरीय संवादात सहभागी होणार
टोकियोमध्ये आपल्या जपानी समकक्षांशी द्विपक्षीय चर्चा करणार
Posted On:
17 NOV 2026 11:38AM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 18 ते 19 नोव्हेंबर 2026 या कालावधीत जपानच्या अधिकृत दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान ते चौथ्या भारत-जपान परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री स्तरावरील संवादात (2+2) सहभागी होतील आणि आपल्या जपानी समकक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री डॉ.एस. जयशंकर, तसेच जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी आणि परराष्ट्र मंत्री तोशिमित्सु मोतेगी, हे टोकियोमध्ये होणाऱ्या 2+2 मंत्रीस्तरीय संवादाचे सह-अध्यक्षपद भूषवतील. या संवादा दरम्यान, द्विपक्षीय धोरणात्मक आणि संरक्षण सहकार्याच्या संपूर्ण व्याप्तीचा आढावा घेतला जाईल, प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर मतांची देवाणघेवाण होईल आणि मुक्त, खुल्या, समावेशक आणि नियमांवर आधारित हिंद-प्रशांत क्षेत्रासाठी दोन्ही देशांची सामायिक वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली जाईल.
भारत आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची द्विपक्षीय चर्चा ही या वर्षातील त्यांची तिसरी भेट असेल. ऑगस्ट 2026 मध्ये नवी दिल्ली येथे आणि ऑक्टोबर 2026 मध्ये सेबू येथे 'आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या अनुषंगाने झालेल्या भेटींमधून मिळालेल्या गतीला पुढे नेत, दोन्ही बाजू संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य, सागरी सुरक्षा, तिन्ही दलांच्या संयुक्त सरावांची व्याप्ती आणि जटिलता वाढवणे, तसेच औद्योगिक भागीदारी अधिक दृढ करण्याबाबत चर्चा करतील.
भारत आणि जपान यांच्यात सामायिक लोकशाही मूल्ये, परस्पर विश्वास आणि सुसंगत धोरणात्मक हितसंबंधांवर आधारित विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी आहे. द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक दृढ करणे आणि दोन्ही देशांमधील ऑपरेशनल आणि औद्योगिक समन्वय वाढवण्यासाठीचा पथदर्शक आराखडा तयार करणे, हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या या भेटीचे उद्दिष्ट आहे.
***
NitinFulluke / RajashreeAgashe / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2337331)
अभ्यागत कक्ष : 22