वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आर्थिक वर्ष 2026-27 च्या एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत भारताच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यातीत 44% वाढ होऊन ती 31.97 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली
स्मार्टफोनच्या निर्यातीत 35.8% वाढ होऊन ती 18.17 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली
आर्थिक वर्ष 2026-27 च्या एप्रिल-सप्टेंबर कालावधीत, स्मार्टफोनव्यतिरिक्त इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत 56.5% वाढ होऊन ती 13.79 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली
Posted On:
17 NOV 2026 3:26PM by PIB Mumbai
भारताच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत 2026-27 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत 44.0% इतकी दमदार वाढ नोंदवण्यात आली असून, ती 31.97 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. 2025-26 या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ती 22.20 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती. इलेक्ट्रॉनिक्स निर्यात क्षेत्रात स्मार्टफोनचा वाटा सर्वाधिक राहिला असला, तरी स्मार्टफोनव्यतिरिक्त इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या निर्यातीत लक्षणीयरीत्या अधिक वेगाने वाढ नोंदवली गेली. यामधून भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीचा विस्तार होत असल्याचे तसेच त्यामध्ये वैविध्य येत असल्याचे दिसून येते. यात प्रिंटेड सर्किट बोर्ड, दळणवळण उपकरणे, मेमरी उत्पादने आणि स्टोरेज उपकरणे यासारख्या विविध उत्पादनांचा समावेश आहे.
स्मार्टफोनची (HS 85171300) निर्यात आर्थिक वर्ष 2026-27 च्या एप्रिल-सप्टेंबर कालावधीत 35.8% वाढ नोंदवत 18.17 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये याच कालावधीत ती 13.38 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती. भारताच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीमध्ये स्मार्टफोनचा वाटा सर्वाधिक राहिला. तथापि, इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या क्षेत्रात जलद वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एकूण निर्यातीतील त्यांचा वाटा 60.3% वरून कमी होऊन 56.8% वर आला.
या कालावधीत, स्मार्टफोनव्यतिरिक्त इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या निर्यातीत 56.5%, वाढ नोंदवण्यात आली असून, ती 8.81 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 13.79 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. परिणामी, एकूण इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत स्मार्टफोनव्यतिरिक्त इतर इलेक्ट्रॉनिक्सचा वाटा 39.7% वरून 43.2%, पर्यंत वाढला. यामधून भारताच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्यातीचा वाढता विस्तार दिसून येतो.
माउंटेड प्रिंटेड सर्किट बोर्ड्स (HS 84733030) समाविष्ट असलेले सुटे भाग आणि उपकरणांची निर्यात 63.3 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून 2.10 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढली. सर्वात जास्त निर्यात सिंगापूर मध्ये झाली असून ती 1.87 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली. त्यापाठोपाठ चीन मध्ये 111.5 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची निर्यात झाली.
नेटवर्क ट्रान्समिशन आणि राउटिंग उपकरणांची (HS 85176290) निर्यात जवळजवळ दुप्पट झाली असून, ती 732.9 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवरून 98% वाढीसह 1.45 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली.
भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीतील वाढ ही निर्यात-मालाच्या अधिक वैविध्यपूर्ण श्रेणीचे प्रतिबिंब असून, यात स्मार्टफोनव्यतिरिक्त इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांनी अधिक वेगाने वाढ नोंदवली, तसेच एकूण निर्यातीत त्याचा वाटाही वाढला. स्मार्टफोन हा सर्वात मोठा घटक राहिला असून त्याची निर्यात 18.17 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली, तर स्मार्टफोनव्यतिरिक्त इतर उत्पादनांच्या विभागाने अधिक जोरदार वाढ नोंदवली असून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एकूण निर्यातीत त्यांचे योगदान वाढले.
प्रिंटेड सर्किट बोर्ड, दळणवळण उपकरणे, मेमरी इंटिग्रेटेड सर्किट्स आणि सॉलिड-स्टेट स्टोरेज उपकरणांच्या क्षेत्रातील विस्तार, तसेच सिंगापूर, चीन, हाँगकाँग आणि मलेशिया यासारख्या बाजारपेठांमधील वाढती निर्यात, भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यात वृद्धीमधील या क्षेत्रांचे वाढते योगदान अधोरेखित करते.
***
Nilima Chitale / Rajashri Agashe / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2337629)
अभ्यागत कक्ष : 20