माहिती आणि प्रसारण मंत्रालय
57 व्या इफ्फी (IFFI) मध्ये इंडियन पॅनोरमा विभागात ईशान्य भारतातील चार चित्रपटांची निवड
उरुम आणि सूर्यमखी, फीचर फिल्म विभागात वर्ल्ड प्रीमियरसाठी सज्ज
‘रेड कार्पेट' आणि ‘चलो इंडिया विथ एरिक जी – मिझोराम’ हे चित्रपट ईशान्य भारतातील सांस्कृतिक कथाविश्व 'नॉन-फीचर फिल्म'च्या कॅनव्हासवर घेऊन येणार
ईशान्य भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती, प्रभावी कथा आणि वैशिष्ट्यपूर्ण सिनेमॅटिक शैलींना 57 व्या इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचे स्थान मिळणार आहे. महोत्सवातील प्रतिष्ठेच्या 'इंडियन पॅनोरमा' या विभागासाठी ईशान्य भारतातील चार चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. गोव्यामध्ये 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या 'इफ्फी' महोत्सवात ईशान्य भारतातील दोन फीचर फिल्म्स (कथा-पट) आणि दोन नॉन-फीचर फिल्म्स (कथाबाह्य चित्रपट) प्रदर्शित केल्या जाणार आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना या प्रदेशाचा मूळ वारसा, सामाजिक स्थित्यंतरे आणि तिथल्या दैनंदिन जीवनाची झलक पाहायला मिळेल.

फीचर फिल्म्स विभागात 'उरुम' (स्पिरिट) हा चित्रपट इफ्फी मध्ये इंडियन पॅनोरमा विभागात निवड झालेला हा न्यिशी भाषेतील पहिलाच चित्रपट असून, हा ऐतिहासिक टप्पा आहे. दुयू तब्यो दिग्दर्शित, अरुणाचल प्रदेशातील हा मानसशास्त्रीय थरारपट, या महोत्सवात जागतिक प्रीमियरसाठीही सज्ज आहे. अरुणाचल प्रदेशातील एका दुर्गम डोंगराळ गावात चित्रित झालेला हा चित्रपट, आपल्या लहान मुलीला गमावल्यानंतर भास आणि अपराधीपणाच्या भावनेने ग्रासलेल्या एका वडीलांच्या कथेतून स्मृती, आघात आणि दडलेली सत्ये उलगडतो.

'उरुम' बरोबरच, फिचर फिल्मच्या श्रेणीत 'सूर्यमखी' (Surjyamukhi) या आसामी नाट्य-पटाचे ही जागतिक प्रीमियर होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री-दिग्दर्शिका आणि नाट्यकर्मी अंतरा जी.जी. चौधरी यांनी केले आहे. शहरी पार्श्वभूमीवर बेतलेल्या या चित्रपटात पुष्पल आणि प्रार्थना या दोन तरुण सहकाऱ्यांची कथा आहे, त्यांच्यातील सुरुवातीचा द्वेष हळूहळू मैत्रीत आणि प्रेमात रूपांतरित होतो. मात्र, पैशांची एक हरवलेली पिशवी सापडल्यावर अनपेक्षित नैतिक पेचप्रसंगांची मालिका सुरू होते, त्यामुळे त्यांचे निर्णय आणि भावनिक संबंधांचा कस लागतो.

इंडियन पॅनोरमा'च्या नॉन-फीचर फिल्म विभागात आसाम आणि मिझोराममधील दोन वेगळ्या कथा सादर होत आहेत. 'रेड कार्पेट' (Red Carpet) हा 30 मिनिटांचा आसामी माहितीपट असून, त्याचे लेखन आणि दिग्दर्शन पुरस्कारविजेते चित्रपट निर्माता एमी बरुआ यांनी केले आहे. हा माहितीपट पारंपरिक हातमाग कारागिरीच्या चिरंतन वारशाचा गौरव करतो.आसाममधील कार्बी आंगलोंग टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा चित्रपट, डोनकामोकाम गावातील एका कार्बी विणकराच्या, कान महोत्सवाच्या 'रेड कार्पेट'पर्यंतच्या विलक्षण प्रवासाचा मागोवा घेतो. त्यांच्या कथेच्या माध्यमातून, हा माहितीपट स्थानिक कारागिरांची जिद्द, कार्बी विणकाम परंपरांची समृद्धता आणि पूर्वजांकडून मिळालेल्या हस्तकलांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.
नॉन-फीचर फिल्म विभागात निवड झालेला दुसरा चित्रपट, 'चलो इंडिया विथ एरिक जी - मिझोराम', हा राजदीप चौधरी दिग्दर्शित 48 मिनिटांचा इंग्रजी माहितीपट आहे. हा चित्रपट ब्रिटनचे माजी संसद सदस्य आणि इतिहास शिक्षक एरिक ओलेरेनशॉ (ओबीई) यांच्या कामावर आधारित आहे, यात ते मिझोरामच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिदृश्याचा शोध घेतात. हा माहितीपट राज्यातील उच्च साक्षरता पातळी, नागरी शिस्त आणि उत्साही फुटबॉल संस्कृतीची झलक दाखवतो, तसेच व्यवसाय, शिक्षण आणि सामुदायिक नेतृत्वात मिझो महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा परिचय करून देतो.

***
Nilima Chitale / Rajashri Agashe / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2337696)
अभ्यागत कक्ष : 11