सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
45 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2026 मध्ये सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे दालन
एकूण 17 लाख 37 हजार रुपयांच्या विक्रीची नोंद, ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसामुळे पारंपरिक कारागिरांच्या उपजीविकेला चालना
Posted On:
17 NOV 2026 7:39PM by PIB Mumbai
स्वदेशी हस्तकला आणि पारंपरिक हस्तनिर्मित वस्तूंबद्दल ग्राहकांमध्ये वाढत असलेली पसंती यंदाच्या 45 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातून दिसून येत आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या या मेळाव्यात सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या दालनात 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत एकूण 17 लाख 37 हजार रुपयांच्या विक्रीची नोंद झाली.
ग्राहकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि बाजारपेठेतील वाढत्या संधी यामुळे सहभागी कारागीर आणि उद्योजकांना प्रोत्साहन मिळत आहे.

आयटीपीओच्या तळमजल्यावरील हॉल क्रमांक 5 मध्ये असलेल्या मंत्रालयाच्या दालनात देशभरातील पारंपरिक हस्तकला आणि हस्तनिर्मित वस्तू मांडण्यात आल्या आहेत. या दालनामुळे कारागिरांना आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवता येत असून, त्यांच्या वस्तूंना बाजारपेठही मिळत आहे. त्यामुळे कारागीर आणि उद्योजकांसाठी उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.



मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाच्या तीन प्रमुख महामंडळांच्या माध्यमातून 19 राज्यांतील 130 हून अधिक कारागीर या व्यापार मेळाव्यात सहभागी झाले असून, ते आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करत आहेत.
या दालनात बारकाईने तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू, पारंपरिक हातमागावरील वस्त्रे, हस्तनिर्मित दागिने, पादत्राणे, कापड, हाताने तयार केलेल्या इतर वस्तू आणि विविध स्वदेशी उत्पादनांचा समावेश आहे. या वस्तूंमधून देशातील विविध भागांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि तेथील कलात्मक परंपरा दिसून येतात, असे त्यांनी सांगितले. एकूण विक्रीत झालेली मोठी वाढ पारंपरिक वस्तूंबद्दल ग्राहकांची पसंती वाढत असल्याचे दिसून येते, तसेच कारागीर आणि लघुउद्योजकांना बाजारपेठेशी जोडणाऱ्या आणि त्यांच्या उपजीविकेला आधार देणाऱ्या संधी निर्माण करण्यात राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनांचे महत्त्वही यातून स्पष्ट होते, असे अधिकारी म्हणाले.


थेट वस्तूंच्या विक्रीची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच, या व्यापार मेळाव्यामुळे सहभागी कारागिरांना ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी समजून घेता येतात, बाजारपेठेतील नव्या प्रवाहांचा अंदाज घेता येतो, नवे व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतात आणि दीर्घकालीन व्यवसायवाढीसाठीच्या संधी शोधता येतात, असे त्यांनी सांगितले. पारंपरिक वस्तू तयार करणारे कारागीर आणि मुख्य प्रवाहातील बाजारपेठ यांच्यातील दरी कमी करण्यात अशा व्यासपीठांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे कारागिरांना आपले कौशल्य, सर्जनशीलता आणि पारंपरिक ज्ञान यांच्या आधारे उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करता येतात, अशी माहिती त्यांनी दिली.


मंत्रालयाच्या दालनाला भेट देणाऱ्यांना भारतातील विविध कलापरंपरांची माहिती घेता येते, कारागिरांशी थेट संवाद साधता येतो. तसेच अस्सल स्वदेशी आणि हस्तनिर्मित वस्तूंची खरेदी करून कारागिरांच्या आर्थिक सक्षमीकरणाला हातभार लावता येतो, असे त्यांनी सांगितले. 13 नोव्हेंबर 2026 रोजी उद्घाटन झालेला 45 वा भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा हा व्यापार, वाणिज्य, उद्योजकता आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील उत्पादक आणि ग्राहक एकत्र आले आहेत.
***
Madhuri Mayekar / Raj Dalekar / Madhura Nerurkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2337701)
अभ्यागत कक्ष : 4